जगभरात कोरोनाचा कहर सुरू असून सध्या सुरू असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत कोरोनाने प्रवेश केला आहे. भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव झाला असून सहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. भारतीय संघ या स्पर्धेत दमदार कामगिरी करत असून आतापर्यंत भारताने दोन सामने जिंकले आहेत. बुधवारी, १९ जानेवारी रोजी भारताने आयर्लंड विरुद्धचा सामना जिंकला. मात्र, त्याआधीच काही खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले.
भारतीय संघाचा कर्णधार यश धुलसह पाच खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. कर्णधार यश धुल, उपकर्णधार शेख रशीद, वासू वत्स, आराध्य यादव, सिद्धार्थ यादव आणि मानव पारख यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना बुधवारी आयर्लंड विरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडावे लागले.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तीन भारतीय खेळाडूंची कोरोना चाचणी आधी पॉझिटिव्ह आली होती. त्याचवेळी त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर सामन्यापूर्वी कर्णधार आणि उपकर्णधाराचीही रॅपिड अँटीजेन चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यामुळे त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून संघाच्या बाहेर ठेवले.
हे ही वाचा:
कुरापती चीनने भारतीय हद्दीतून १७ वर्षीय मुलाचे केले अपहरण
कोरोना प्रतिबंधक लसी आता मेडिकल स्टोअर्समध्ये मिळणार
लंडनच्या आलिशान घरातून विजय मल्ल्याला काढणार बाहेर
कर्णधार यश धुल याने पहिल्या सामन्यात म्हणजेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. बुधवारी झालेल्या सामन्यात यश धुलच्या अनुपस्थितीत निशांत सिंधूने भारतीय संघाचे नेतृत्व केले. आता धुलच्या अनुपस्थितीत भारतीय संघ शनिवारी युगांडाशी खेळणार आहे. मात्र, आता केवळ ११ खेळाडूच उपलब्ध असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.