योगगुरू रामदेव, बाळकृष्ण यांच्याकडून बिनशर्त माफी

योगगुरू रामदेव, बाळकृष्ण यांच्याकडून बिनशर्त माफी

योगगुरू बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी बिनशर्त आणि विनाअट माफी मागितली. पतंजलीच्या उत्पादनांच्या औषधी गुणधर्मांविषयी दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल ही माफी मागण्यात आली. रामदेव यांनी असेही आश्वासन दिले आहे की, ते न्यायालयाच्या अधिकाराला बाधा पोहोचवणारे किंवा आधुनिक औषधांच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे कोणतेही सार्वजनिक विधान करणार नाहीत.

पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी देखील, ‘बिनशर्त माफी’ मागणारे नवीन प्रतिज्ञापत्र सादर केले आणि भविष्यात औषधाच्या इतर प्रकारांबद्दल विवादास्पद टिप्पणी किंवा पतंजली उत्पादनांबद्दल अशास्त्रीय दावे करणारी कोणतीही विधाने किंवा जाहिराती केली जाणार नाहीत, असे सांगितले. रामदेव आणि बाळकृष्ण यांनी ६ एप्रिल रोजी स्वतंत्रपणे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात हे नमूद केले आहे. या प्रतिज्ञापत्रांवर बुधवारी सर्वोच्च न्यायालय विचार करणार आहे.

गेल्या वर्षी २१ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या निवेदनाचे उल्लंघन केल्याबद्दल रामदेव बाबा आणि बाळकृष्ण यांनी दोन स्वतंत्र प्रतिज्ञापत्रे सादर करून विनाअट माफी मागितली. त्यांच्या वकिलांनी, यापुढे विशेषतः त्यांनी निर्मिती आणि विपणन केलेल्या उत्पादनांची जाहिरात किंवा ब्रँडिंगशी संबंधित कायद्याचे कोणतेही उल्लंघन होणार नाही, तसेच त्यांच्या वैद्यकीय गुणधर्मांविषयी किंवा कोणत्याही उपचारपद्धतीच्या विरोधात मनमानी विधाने केली जाणार नाहीत, अशी हमी दिली होती. मात्र त्याचे पालन न केल्यामुळे न्यायालयाने त्यांना माफी मागण्यास सांगितले होते. ही माफी पुरेशा गांभीर्याने मागितलेली नाही. त्यामळे २ एप्रिल रोजी न्यायमूर्ती हिमा कोहली आणि अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने दोघांची कानउघाडणी केली होती.

हे ही वाचा:

१० वर्षांत सेन्सेक्स २५ हजारांवरून ७५ हजारांवर!

हैदराबादचा घरच्या मैदानाशिवाय पहिलाच विजय!

“भविष्य पाहायचे आणि अनुभवायचे असेल तर भारतात या”

दिल्ली उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर केजरीवाल ठोठावणार सर्वोच्च न्यायालयाची दारे

दोघेही खंडपीठासमोर प्रत्यक्ष हजर असताना, न्यायालयाने इंडियन मेडिकल असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेत दिलेल्या वचनबद्धतेचे पालन न केल्याची गंभीर दखल घेतली आणि त्यांना नवीन प्रतिज्ञापत्र एका आठवड्यात सादर करण्याची अंतिम संधी दिली होती. त्यानंतर ही नवीन प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली आहेत.
रामदेव यांच्याकडून जबाबदार वर्तनाची अपेक्षा करत न्यायालयाने ‘तुमच्या सारख्या व्यक्तींचा समाजात आदर आहे. म्हणून आम्ही हे गांभीर्याने घेत आहोत. तुम्ही योगसाठी चांगले काम केले आहे. सामान्य जनतेपेक्षा तुमच्याकडून मोठी जबाबदारी अपेक्षित आहे,’ असे नमूद केले.

Exit mobile version