दादर स्टेशनबाहेरच्या नारळवाल्यांना ‘नारळ’ कोण देणार?

नारळ विक्रेते धारदार सुऱ्या तशाच नारळावर खोचून, बारदानामध्ये बांधून ठेवतात

दादर स्टेशनबाहेरच्या नारळवाल्यांना ‘नारळ’ कोण देणार?

दादर हे पश्चिम आणि मध्य रेल्वेला जोडणारे एक महत्त्वाचे स्थानक आहे. दादरमधून दररोज लाखो प्रवाशांची ये-जा असते. दादर पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर फुलांची आणि भाज्यांची मोठी बाजारपेठ आहे. पहाटेपासून या ठिकाणी लोकांची मोठी वर्दळ असते. फेरीवाल्यांनी इथे आपले बस्तान मांडले आहे. दादरमधील फेरीवाल्यांच्या मनस्तापाचा मुद्दा तसा जुनाच आहे. पण या फेरीवाल्यांबरोबर आता भर पडली आहे ती जिकडेतिकडे दिसणाऱ्या नारळ विक्रेत्यांची.

दादर स्थानक परिसरात या नारळ विक्रेत्यांची संख्या अचानक वाढू लागली आहे. या नारळविक्रेत्यांनी आपले बस्तान दादर पश्चिम स्थानकाबाहेरील परिसरापासून थेट मनिष मार्केट, फूलमार्केटपर्यंत पसरवले आहे. जवळ जवळ १५ हून अधिक नारळविक्रेते व्यवसाय करत असतात. एवढे नारळविक्रेते अचानक आले कुठून असा सवाल येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या मनात येतो.

या नारळविक्रेत्यांकडे नारळ सोलण्यासाठी धारदार सुऱ्या असतात. नारळ विक्रेते या सुऱ्या तशाच नारळावर खोचून, बारदानामध्ये बांधून ठेवून देतात. फेरीवाल्यांना साधी सुरी वापरायलाही परवानगी नसताना, या नारळविक्रेत्यांना धारदार सूऱ्या बाळगण्याची परवानगी दिली कुणी? असा प्रश्न विचारला जातो. पोलिस आणि महानगर पालिका याकडे डोळेझाक का करताहेत, या नारळ विक्रेत्यांना वरदहस्त कोणाचा आहे, असे नानाविध प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिस यंत्रणेचेही याकडे लक्ष आहे का, असाही प्रश्न उपस्थित होतो आहे.

याआधीही दादर परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना घडलेल्या आहेत. दादर स्थानकात रेल्वे पकडण्यासाठी लाखो प्रवासी या ठिकाणाहून ये-जा करत असतात. एखाद्या विकृताने, माथेफिरूने या उघड्यावर ठेवलेल्या सुऱ्यांचा दुरुपयोग केला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असे प्रश्न दादरमधील स्थानिक विचारताना दिसताहेत. या विक्रेत्यांकडील नारळांवर सुरे खोचलेले असतात. नारळविक्रेता जागेवर नसतो तेव्हा ते सुरे तिथे तसेच पडलेले असतात, अशा वेळेला त्या सुऱ्याचा दुरुपयोग केला जाण्याची शक्यता असते.

पश्चिम रेल्वेच्या फलाट क्रमांक एकच्या बाहेरील स्थानकाबाहेर मुंबई महापालिकेची गाडी उभी असते. या गाडीशेजारी एकही फेरीवाला धंदा लावत नाही. परंतु स्थानाच्या १५० मीटरच्या परिसरात फेरीवाले बिनदिक्कत धंदा करतानाचे चित्र आहे. महापालिकेची गाडी या नारळविक्रेत्यांवर कारवाई का करत नाही. स्थानिक पोलिस आणि महापालिकेला हे नारळ विक्रेते नजरेस पडलेले नाहीत का, पोलिस यांच्याकडे कानाडोळा का करत आहेत. त्यांच्यावर कारवाई का होत नाही, अशीही विचारणा होत आहे.

फेरीवाला कायद्यानुसार स्टेशन, शाळा, मंदिर-मस्जिद यांच्या १५० मिटरच्या आवारात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे. मग एवढ्या संख्येने या नारळवाल्यांना बसायला देण्यामागे कोणाचा वरदहस्त आहे? कुठे गेले नियम. कोण नियम धाब्यावर बसवतोय, यांच्यावर कारवाई का करत नाही, असे असंख्य प्रश्न निर्माण होतात.

Exit mobile version