श्रीलंकेच्या नौदलाने केलेल्या गोळीबारात डेल्फ्ट बेटावर पाच भारतीय मच्छिमार जखमी झाल्याच्या घटनेवर भारताने मंगळवारी (२८ जानेवारी) आक्षेप व्यक्त केला. पहाटे घडलेल्या या घटनेनंतर परराष्ट्र मंत्रालयाने नवी दिल्लीतील श्रीलंकेच्या कार्यवाहक उच्चायुक्तांना बोलावून गोळीबाराबद्दल नाराजी व्यक्त केली. बळाचा वापर कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याचे भारताने स्पष्टपणे म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ‘आज सकाळी डेल्फ्ट आयलंडजवळ १३ भारतीय मच्छिमारांना पकडताना श्रीलंकेच्या नौदलाने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. मासेमारी बोटीवरील १३ मच्छिमारांपैकी दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जाफना शिक्षण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्य तीन मच्छिमार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. जाफना येथील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जखमी मच्छिमारांची भेट घेतली आणि त्यांची प्रकृती जाणून घेतली. मच्छिमार आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांनी सर्वतोपरी मदत केली आहे.
हे ही वाचा :
राणा अय्युब विरुद्ध एफआयआर दाखल
विद्यार्थ्याने दोन मिनिटात सांगितली १२० तालुक्यांची नावे, मुख्यमंत्री म्हणाले, ‘हे अस्सल हिरे’
सॅम पित्रोदा म्हणतात, बिच्चारे बांगलादेशी पैसे कमवायला येतात, त्यांना त्रास का देता?
जयपूरमध्ये ५०० रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांना अटक
निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘नवी दिल्लीतील श्रीलंकेच्या कार्यवाहक उच्चायुक्तांना आज सकाळी परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले आणि या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. कोलंबोमधील आमच्या उच्चायुक्ताने हे प्रकरण श्रीलंका सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडेही उचलले आहे. बळाचा वापर कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. या संदर्भात दोन्ही सरकारांमधील विद्यमान समजूतदारपणाचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.