देशावर इंग्रजांची जुलमी राजवट होती. साधनसंपत्तीची लूट, जबरदस्तीने धर्मांतर यामुळे त्रस्त झालेल्या रयतेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सगळ्याच जाती- जमातींनी संघर्ष केला. या सर्वांमध्ये ब्रिटिश काळात क्रांतीची मशाल पेटवली ते आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांनी. ७ सप्टेंबर ही त्यांची जयंती.
उमाजींचा जन्म पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी दि. ७ सप्टेंबर १७९९ रोजी रोजी झाला. दादोजी खोमणे आणि लक्ष्मीबाई हे त्यांचे आई- वडील होते. जेजुरीचे मल्हारी मार्तंड खंडोबा हे उमाजी नाईक यांचे आराध्य दैवत होते. त्यांचे बालपण पुरंदर किल्ल्याच्या परिसरात गेले आणि त्यांना तलवारबाजी, घोडेस्वारी, भाला चालवणे, दांडपट्टा इत्यादी गोष्टी त्यांच्या आईकडून शिकविण्यात आल्या. उमाजींची आई त्यांना शिवाजी महाराजांच्या कथा सांगायची आणि शिवाजी महाराजांच्या कथा ऐकून त्यांच्या मनात क्रांतीची भावना जागृत झाली. त्यानंतर त्यांनी प्रत्येक कला लवकर आत्मसात केली आणि ब्रिटिश सरकारला भारतातून हाकलून देण्याचे स्वप्न पाहिले.
रामोशी समाजाकडे पुरंदर किल्ल्याचे रक्षण करण्याचे काम होते. मात्र १८०३ मध्ये इंग्रजांनी रामोशी समाजाकडून हे काम काढून घेतले. इंग्रजांच्या या निर्णयामुळे पुरंदरमधील रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली होती. महिला, मुलांना अन्न मिळेनासे झाले होते. पुढे उमाजी नाईक इंग्रज, वतनदार तसेच सावकारांना लुटायचे. लुटलेले धन तसेच अन्न गरीब लोकांमध्ये वाटायचे. १८१८ मध्ये उमाजी यांना एका वर्षाचा तुरुंगवास झाला. त्यानंतर आणखी एका दरोड्यात त्यांना पकडण्यात आले. यावेळी त्यांना सात वर्षाची शिक्षा झाली होती. या काळात ते लिहायला व वाचायला शिकले. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांच्या सरकार विरोधातील कारवाया आणखी वाढल्या. उमाजी हे देशासाठी लढत असल्याने जनताही त्यांच्या सोबत येऊ लागली.
हे ही वाचा:
सर्वांनी सीट बेल्ट बांधा नाहीतर समजा झालाच वांधा
कर्मचाऱ्याने स्वतःच्याच कार्यालयात घातला दरोडा; अशी पकडली गेली चोरी
तिने आपल्या लहानग्याला वाघाच्या जबड्यातून खेचून आणले
उद्धव ठाकरे संजय राऊत यांना तुरुंगात भेटणार होते पण
उमाजी नाईक आणि इंग्रज यांच्यातील संघर्ष पुढे वाढतच गेला. आज हे बंड असले तरी असे हजारो बंड सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील. तुम्हाला जेरीस आणतील असे त्यांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले. उमाजी नाईक यांनी इंग्रजी सत्तेविरोधात जाहीरनामाच प्रसिद्ध केला. लोकांनी इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात. त्यांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा देऊ नये. देशवासीयांनी एकाचवेळी जागोजागी गोंधळ घालून आराजकता माजवावी. इंग्रज राजवट लवकरच संपुष्टात येत आहे. त्यांना कोणी मदत करु नये. इंग्रजांना मदत केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करील, असे सांगून नवीन स्वराज्य उभारण्याचा प्रयत्न केला. स्वतःची फौज उभी केली. उमाजी यांनी राज्यात स्वतःचा ध्वज निर्माण केला. उमाजींचा जाहीरनामा इंग्रजांना हादरावणारा होता.
डिसेंबर १८३१ रोजी रात्री बेसावध असताना उमाजीला इंग्रजानी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीत काळ्या खोलीत त्यांना ठेवण्यात आले. उमाजीवर देशद्रोहाचा खटला चालवून न्यायधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवत उमाजी नाईक यांना फाशीची शिक्षा सुनावली. खडकमाळ आळीत मामलेदार कचेरी समोर देशासाठी हसत हसत नरवीर उमाजी नाईक ३ फेब्रुवारी १८३२ रोजी फासावर चढले. त्यावेळी त्यांचे वय ४३ वर्षाचे होते. इंग्रजानी त्यांचे साथीदार खुशाबा नाईक व बाबू सोळस्कर यांनाही फाशी दिली. इतरांना दहशत बसावी म्हणून त्यांचा देह पिंपळाच्या झाडाला तसाच तीन दिवस लटकत ठेवला होता. अशा प्रकारे धगधगत्या क्रांतीकारकाच्या बंडाचा शेवट झाला.