कालपासून सुरू झालेल्या पावसाने आजही संपूर्ण ठाणे जिल्ह्यात अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्याची अवस्था बिकट झाली आहे. अतिवृष्टीमुळे कल्याण-डोंबिवलीत वालधूनी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. तर उल्हास नदीला पूर आला आहे. त्याचबरोबर बदलापूरमध्येही पूरस्थिती निर्माण झाली आहे.
कल्याण-डोंबिवलीत गेल्या २४ तासात १७७ मिली मीटर पाऊस पडला आहे. या प्रमाणातील पावसामुळे अधिकृतरीत्या अतिवृष्टीची पातळी गाठली आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. काही झोपडपट्ट्यांमध्येही पाणी शिरले आहे. नागरिकांची इतरत्र राहण्याची व्यवस्था केली जात आहे. रात्री नऊ वाजता २.५ मीटरची भरती येणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यासाठी सखल भागातील (लो लाईंग एरिया) नागरीकांना स्थलांतरीत करण्याचे काम सुरू असल्याची माहिती कल्याण-डोंबिवली पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
अतिवृष्टीमुळे कल्याणच्या वालधूनी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे कल्याण पश्चिमेतील वालधूनी, अशोकनगर, शिवाजी नगर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे या परिसरातील शेकडो लोकांना इतरत्रं हलविण्यात आलं आहे. डोंबिवलीत एका केमिकल कंपनीने नाल्यात केमिकल सोडल्याने नाल्याचा प्रवाह हिरवा गार झाला होता. त्यामुळे परिसरातील रहिवाश्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र, पालिका आयुक्त सूर्यवंशी यांनी या कंपनी विरोधात मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली आहे. एमआयडीसीकडून रायबो कंपनीचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात आहे. प्रदूषण मंडळाने कंपनीच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
हे ही वाचा:
…हे तर मुंबईवर बेतलेल्या संकटाचे संकेत
अमरिंदर विरुद्ध सिद्धू वाद चिघळणार?
शेर बहादुर देउबांवर नेपाळला ‘विश्वास’
येत्या २४-३६ तासांत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा
कल्याण-डोंबिवलीत सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. रात्री जोरदार पावसामुळे टिटवाळा-कल्याण या मुख्य रस्त्यावर कल्याणी येथे रस्त्याचा काही भाग खचल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. आजूबाजूच्या परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते आणि या पाण्यामुळे हा रस्ता खचल्याची माहिती महापालिकेचे अधिकारी राजेश सावंत यांनी दिली.