जग नवीन वर्षाच्या स्वागतात मग्न असताना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या आदेशानुसार रशियन सैन्याने राजधानी कीवसह अनेक शहरांना क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले. ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता रशियाने केलेल्या हल्ल्यांमध्ये एका नागरिकांचा मृत्यू झाला आणि १४ जण जखमी झाले. काल रात्री झालेल्या या प्राणघातक हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, रशिया जाणीवपूर्वक निष्पाप नागरिकांना लक्ष्य करत आहे.
ओलेना झेलेन्स्का संतापल्या
युक्रेनच्या फर्स्ट लेडी ओलेना झेलेन्स्का यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला इतक्या मोठ्या क्षेपणास्त्र हल्ल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. ओलेना म्हणाल्या, दुसऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणे ही आपल्या शेजाऱ्यांची घृणास्पद सवय आहे. सणासुदीच्या वेळीही त्यांनी आमच्या लोकांवर हल्ले केले. जग जल्लोषात मग्न असताना युक्रेनवर हिंसक हल्ले करण्यात आले.
युक्रेनमध्ये तणाव
युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी अलीकडच्या काळात नागरिकांवर झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख केला. ते पुढे म्हणाले की, यावेळी रशियाने केवळ ऊर्जा पायाभूत सुविधाच नव्हे तर निवासी क्षेत्रांनाही लक्ष्य केले आहे. शनिवारी दुपारी कीवमध्ये विविध निवासी इमारती आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले. युक्रेनमधील स्थानिक रशियन बॉम्बहल्ला आणि वीज आणि पाणी टंचाईमुळे त्रस्त आहेत आणि रशियाने १० महिन्यांपूर्वी सुरू केलेले युद्ध अद्यापही सुरूच असल्याने नवीन वर्षाचा उत्साह मंदावला आहे.
पुतिनच्या उलट्या बोंबा
नवीन वर्षाच्या निमित्ताने देशवासियांना संबोधित करताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पाश्चात्य देशांवर आक्रमक भूमिका घेतल्याचा आणि रशियाला कमकुवत करण्यासाठी युक्रेन युद्धाचा वापर केल्याचा आरोप केला. यादरम्यान पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याच्या निर्णयाचा बचाव केला. रशियाच्या सुरक्षेला धोका असल्याने युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्याशिवाय मॉस्कोकडे पर्याय नसल्याचे ते म्हणाले.