‘मॉस्को हल्ल्याशी संबंध असल्याचा रशियाचा आरोप धादांत खोटा’

युक्रेनचे रशियाला सडेतोड प्रत्युत्तर

‘मॉस्को हल्ल्याशी संबंध असल्याचा रशियाचा आरोप धादांत खोटा’

FILE PHOTO: Ukraine's Foreign Minister Dmytro Kuleba attends a high level meeting of the United Nations Security Council on the situation amid Russia's invasion of Ukraine, at the 77th Session of the United Nations General Assembly at U.N. Headquarters in New York City, U.S., September 22, 2022. REUTERS/Amr Alfiky

रशियाची राजधानी मॉस्कोमधील कॉन्सर्ट हॉलमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्याचा संबंध रशियाने युक्रेनशी जोडला होता. मात्र युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी हे आरोप धादांत खोटे असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत.
२२ मार्च रोजी मॉस्कोमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात १४४ जण मृत्युमुखी पडले होते. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती.

गेल्या दोन दशकांतील हा सर्वांत भयानक हल्ला होता. हा हल्ला इस्लामिक स्टेट खोरासन (आयएसआयएस-के) या अफगाणिस्तानमधील दहशतवादी गटाने केल्याची माहिती अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनीही त्यांच्या गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली होती. तरीही रशियाने या हल्ल्याचा संबंध युक्रेनशी जोडला होता. तसेच, हल्ला करणाऱ्या एका बंदुकधाऱ्याचा संबंध ‘युक्रेनच्या राष्ट्रवाद्यांशी’ असल्याचा पुरावा आढळल्याचा दावाही करण्यात आला होता. मात्र ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी रशियाचे आरोप फेटाळून लावले असून हा रशियन प्रचारतंत्राचा भाग असल्याचे म्हटले होते.

हे ही वाचा:

वाढदिवसाचा केक खाल्ल्यानंतर १० वर्षीय मुलीचा मृत्यू

मविआमध्ये एकोपा नाही; प्रकाश आंबेडकरांचा घाणाघात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील परभणीची जागा रासपाच्या महादेव जानकरांना

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर जल्लोष करणाऱ्याला मारहाण; ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

‘हे धादांत खोटे आहे. जगभरात काहीही घडले तरी रशियाचा प्रयत्न दोन हेतू साध्य करण्याचा असतो. एक म्हणजे जगाच्या नजरेत युक्रेनला बदनाम करणे आणि युक्रेनविरुद्ध संपूर्ण रशियन नागरिकांना एकत्रित आणणे. रशिया त्यांच्याविरुद्ध बेकायदा आक्रमण करण्यासाठी निमित्त शोधण्याचा प्रयत्न करते आहे,’ असा दावा त्यांनी केला. ‘जेव्हा मी मॉस्कोच्या हल्ल्याचे वृत्त ऐकले, तेव्हा मी माझ्या सहकाऱ्यांना म्हणालो, पुढच्या २४ तासांत ते स्फोटाशी युक्रेनचा संबंध जोडू पाहतील,’ याची आठवण कुलेबा यांनी करून दिली.

‘रशियन प्रचारतंत्र पाहिल्यास एक बाब जाणवते ती म्हणजे त्यांना युक्रेनचा पराभव करण्याच्या विचाराने पछाडले आहे. जर त्यांना हे ध्येय साध्य करण्यासाठी खोटे जरी बोलावे लागले तर ते बोलतील आणि तेच ते करत आहेत,’ असाही दावा त्यांनी केला.

Exit mobile version