विद्यापीठ व कॉलेजांमध्ये सहायक प्राध्यापकांच्या नेमणुकीसाठी आवश्यक असलेल्या यूजीसी-नेट परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाल्याने ही परीक्षा नव्यने घेण्याचा निर्णय बुधवारी राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) जाहीर केला.
१८ जून रोजी देशभरातील ३१७ शहरांमधील १२०५ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. ११ लाखांहून अधिक उमेदवार या परीक्षेला बसले होते. मात्र परीक्षेत काही गैरप्रकार झाले असल्याची माहिती मिळते आहे, असे एनटीएने विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) कळवले आहे. हे प्रकरण सखोल तपासासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) कडे सोपवण्यात येत आहे, असे एनटीएने सांगितले.
परीक्षेवर प्रश्न उपस्थित करणारे ही माहिती भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरच्या नॅशनल सायबर क्राइम थ्रेट ॲनालिटिक्स युनिटकडून प्राप्त झाली आहे. हा विभाग गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. ‘परीक्षा प्रक्रियेची उच्च पातळीची पारदर्शकता आणि पावित्र्य सुनिश्चित करण्यासाठी, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने यूजीसी-नेट जून २०२४’ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुन्हा नव्याने परीक्षा दिली जाईल. त्याबाबतची माहिती लवकरच जाहीर केली जाईल, असे एनटीएने एका निवेदनात म्हटले आहे.
भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये असिस्टंट प्रोफेसर आणि/किंवा ज्युनियर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) या पदासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी यूजीसी-नेट आयोजित केले जाते. जूनमध्ये झालेल्या नेट परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी होत्या. एनटीएला यामध्ये तथ्य आढळून आल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली. तसेच, या गैरप्रकारांची कशी सीबीआयकडे सोपवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे, असे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने कळवले आहे.
हे ही वाचा..
पत्नीच्या मृत्यूने बसला धक्का, आसामच्या गृहसचिवानं स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या!
कॅनडाच्या संसदेत खलिस्तानी दहशतवाद्याला श्रद्धांजली
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो शोधताहेत भारत संबंधांमध्ये ‘संधी’
बिहारसारख्या राज्यांमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांसह नीट यूजी २०२४ परीक्षेत अशाच प्रकारच्या विसंगती आढळून आल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. नीट परीक्षेत तब्बल ६७ विद्यार्थ्यांनी ७२० गुण मिळवले, जे एनटीएच्या इतिहासात अभूतपूर्व असल्याचे मानले जात आहे. हरियाणाच्या फरीदाबाद येथील केंद्रातील सहा विद्यार्थ्यांनी यादीत स्थान मिळवल्यामुळे गैरप्रकार झाला असल्याबाबत शंका निर्माण झाली. वरच्या क्रमांकावर असलेल्या ६७ विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.