शिल्लक सेनेसाठी सध्या फारच बिकट स्थिती आहे. काळ कठीण असतो तेव्हा दुर्बलातला दुर्बल माणूस ताकद पणाला लावून परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो. याला अपवाद फक्त पक्ष हातातून निसटलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा. कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणूक प्रचाराचा आज अखेरचा दिवस. भाजपा महायुती आणि महाविकास आघाडीने या पोटनिवडणुकीसाठी ताकद लावली. सगळे नेते झाडून प्रचाराला उतरले आजारपणामुळे गलितगात्र झालेले गिरीश बापटही मैदानात उतरले, परंतु उद्धव यांची उडी ऑनलाईन पलिकडे गेली नाही.
मविआने या निवडणुकी निमित्त पुन्हा एकदा जाती-पातीचे नीच राजकारण केले. कसब्यातून हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यामुळे ब्राह्मण नाराज अशी आवई उठवली. गिरीश बापट यांच्या सुनेला उमेदवारी नाकारल्यामुळे बापट नाराज अशी पूडी सोडली. आजारपणाशी लढणाऱ्या बापटांच्या नावे अपप्रचार झाल्यामुळे बापटांना नाईलाजाने प्रचारात उतरून रासने यांच्यासाठी मतं मागावी लागली. जेव्हा बापट प्रचारासाठी उतरले तेव्हा मविआचे नेते भाजपा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने बोटं मोडू लागले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी बापटांना प्रचार सभेत उतरवण्याविरुद्ध नापसंती व्यक्त केली. सुप्रिया सुळे यांनी घरात डोकावून पाहिले असते तर कदाचित त्यांना असा अपप्रचार करण्याची बुद्धी झाली नसती. वडील शरद पवार ८३ वर्षाचे वृद्ध नेते आहेत, दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. तरीही मुलीच्या भविष्यासाठी अजूनही कष्ट उपसतायत. सुप्रिया जर त्यांना म्हणाल्या असत्या की बाबा आता काही तुम्ही पंतप्रधान होत नाही, मुख्यमंत्रीही होण्याची शक्यता नाही, आता घरी बसा आणि आराम करा, तर बापटांच्या प्रचारात उतरण्याबाबत त्यांनी केलेली टीका उचितही वाटली असती. त्यांच्या सल्ल्यानंतर पवार घरी बसले असते अशी शक्यता अजिबात नाही, परंतु सुळे यांनी मुलीचे कर्तव्य पार पाडले असे तरी लोक म्हणाले असते.
काल पक्ष नसलेले पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कसबा-चिंचवडच्या उमेदवारांसाठी ऑनलाईन प्रचार केला. आपल्या भाषणात त्यांनी आजारी बापटांना प्रचारात उतरवणे अमानुष असल्याचे सांगितले. कर्तव्यनिष्ठा नावाचा एक सदगुण असतो हे बहुधा उद्धव ठाकरे यांना ठाऊक नसावे. त्यासाठी मुळात कर्तव्य करण्याची सवय असावी लागते. अखेरच्या श्वासापर्यंत सक्रीय असलेले दिवंगत भाजपा नेते मनोहर पर्रीकर यांच्याविरोधात सामनाने एक अत्यंत सडका अग्रलेख लिहिलेला. पक्ष आणि पद फक्त पैसे छापण्यासाठी असतो एवढीच समज असल्यावर अखेरच्या श्वासापर्यंत पक्षाचे काम करणाऱ्यांची भावना कळू शकत नाही. जे पर्रिकरांनी केले तेच मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप यांनी केले. तेच बापटांनी केले. मुक्ता टिळक आणि जगताप जर्जर अवस्थेत विधान परिषद आणि राज्यसभेच्या मतदानासाठी आले, त्यांना माहीत होतं की यापुढे पक्षाकडून काही मिळाले तरी ते घेण्याइतपत वेळ आपल्याकडे शिल्लक नाही, तरीही हे दोघे हॉस्पिटलमधून पक्षासाठी धावले. ज्या पक्षाकडे असे कार्यकर्ते नेते असतात ते पक्ष मोठे होतात. घरी बसलेल्या नेत्याच्या पक्षाचे काय होते, हे उद्धव यांनी दाखवूनच दिले आहे.
हे ही वाचा:
आव्हाडांचे घालीन लोटांगण कशासाठी?
कणेरी मठात ५२ गाई दगावल्या, तर ३० गंभीर
औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्हे आता ‘छत्रपती संभाजी नगर’ आणि ‘धाराशिव’
मानेवरील शस्त्रक्रियेचे कारण पुढे करून उद्धव ठाकरे बराच काळ घरातून बाहेर पडले नाहीत. कारण मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीपेक्षा त्यांना शरीराचे कौतुक जास्त होते. त्यांना पर्रिकर कळले नाहीत, टिळक, जगताप कळले नाहीत आणि बापटही कळणार नाही. त्यासाठी हृदयात धगधगता अंगार असावा लागतो.
बापटांना प्रचारात उतरणे उद्धव ठाकरे यांना अमानुष वाटले कारण त्यांना उंटावरून शेळ्या हाकण्याची सवय आहे. यात सवयीमुळे शेळ्या कधी गायब झाल्या हे त्यांना कळलेच नाही. पोटनिवडणुका दोन्ही पक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत कारण बाहेर येणाऱ्या निकालांमध्ये राज्याचे राजकीय समीकरण बदलण्याची क्षमता आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीचे सर्व नेते शरद पवार, सुप्रिया सुळे नाना पटोले, अजित पवार ही सगळी मंडळी भर उन्हात प्रचारासाठी उतरली.
ठाकरेंना मात्र घराबाहेर पडावेसे वाटले नाहीत. मुख्यमंत्री असताना जे हवंय ते घरपर्यंत येत होते. सचिन वाझे यांच्यासारखे लोक त्यासाठी राबत होते. त्यामुळे उगाच लोकांची कामे करण्यासाठी मंत्रालयापर्यंत कशाला जा? घर बसल्या जर तुम्हाला बेस्ट सीएमचे बिरुद मिळत असेल तर बाहेर पडून उगाच धुळमाती अंगाला लावून घेण्याची गरज काय? असा ही विचार असावा.
शाळा ते घर, घर ते शाळा आम्हा येतो कंटाळा असे एक बालगीत आहे. उद्धव ठाकरे यांना मात्र मातोश्री ते शिवसेनाभवन अशा चकरा मारण्याचा कंटाळा येत नाही. किंबहुना घरी बसण्याचाही कंटाळा येत नाही. संघाच्या मुशीतून भाजपाची जडणघडण झाली. संघाचे द्वितीय सरसंघचालक श्री माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य गोळवलकर गुरूजींना आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात कँसरने गाठले. परंतु तरीही ते अखेरच्या क्षणापर्यंत कार्यरत होते. प्रवास करायचे, लोकांशी गाठीभेटी, पत्रलेखन सर्व कामे त्यांनी सुरू ठेवली होती. तोच पीळ अनेकदा भाजपाचे नेते कार्यकर्ते दाखवतात. वृत्तासुराला ठार करण्यासाठी दधीची ऋषींनी इंद्राला स्वत:ची हाडे दिली, त्यातूनच वज्र घडवण्यात आले. ही दधिची परंपरा अजूनही खंडीत झालेली नाही, याचा सार्थ अभिमान भाजपाच्या कार्यकर्त्यांना आहे. उद्धवजी ही क्षमताही तुमच्याकडे नाही आणि परंपराही नाही, म्हणून तुम्ही घरबसल्या याला अमानुषपणाचे नाव देता आणि नाक मुरडता.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)