नागपूरात घडलेल्या कालच्या हिंसाचाराच्या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. या हिंसाचाराला सत्ताधारी नेते जबाबदार असल्याचे विरोधक बोलत आहेत. याच घटनेवरून मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज (१८ मार्च) सभागृहात निवेदन दिले. यावेळी औरंगजेबाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनिल परब यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पहायला मिळाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्ला चढवत मविआच्या काळातील घटनांचा उल्लेख केला. उबाठाचे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर देखील उपमुख्यमंत्री शिंदेनी निशाणा साधला. खुर्चीसाठी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले आणि औरंगजेबाचे विचार धरले, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, यांचे प्रमुख हे गेले होते लोटांगण घालून आले. मला वाचवा आम्ही युती सरकार स्थापन करू असे, तिकडे जाऊन सांगून आले आणि इकडे येवून पलटी मारली. मुख्यमंत्री फडणवीस, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, आशिष शेलार यांना तुरुंगात टाकून मविआमध्ये भाजपाचे आमदार घेणार होते. त्याच वेळी मी यांचे नाव फोडले, यांचा टांगा पलटी केला आणि महायुतीचे सरकार आणले.
एकनाथ शिंदेने धाडस केले आणि शिवसेना, धनुष्यबाण वाचवले. म्हणून ८० पैकी ६० जागा आल्या, तुम्ही १०० जागा लढवल्या केवळ २० जागा आल्या. जनतेने तुम्हाला धडा शिकविला आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याकुब मेमन याची कबर सजवली, पाकिस्तानचे झेंडे नाचवले आणि हिंदुत्वाचे नाव घेता?, लाज वाटली पाहिजे.
ते पुढे म्हणाले, एक अंदर कि बात है, यांचे प्रमुख पण मोदींना जाऊन भेटले आणि म्हणाले मला माफ करा, आम्ही पुन्हा येतो म्हणाले आणि इकडे येवून पलटी मारली. अनिल परब यांच्यावर निशाना साधत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नोटीस आल्यानंतर तुम्ही सुद्धा गेले होते आणि म्हणाले यामधून मला वाचवा. नंतर सुटल्यावर तुम्ही यातून पलटी मारली. याबाबत सर्व माहिती मला माहित आहे. आम्ही जे केले ते खुलेआम केले, लपून-छपून नाही. तुमच्यात हिम्मत आहे का?. हे करायला वाघाचे काळीज लागते, ‘लांडगा वाघाचे कातडं पांघरून, वाघ होवू शकत नाही’. घर का ना घाट का, अशी तुमची परिस्थिती झाली आहे.
हे ही वाचा :
मार्चच्या अखेरीस ओडिशात होणार राष्ट्रीय खोखो स्पर्धा
अमेरिकेच्या DOGE प्रमाणेच मोदींच्या मॉडेलमुळे भारताचे वाचले पाच लाख कोटी
“हजारो मैल दूर असला तरी, आमच्या हृदयाच्या जवळ आहात”
गौतम गंभीर रायपूरमध्ये युवा क्रिकेटपटूंना देणार प्रशिक्षण
मी कधीही कंबरेच्या खाली वार करत नाही. मला सर्व अंडीपिल्ली माहिती आहेत, कोण कोठे, कशासाठी गेले मला याची माहिती आहे. मी तुमच्या पक्ष प्रमुखांना सांगितले होते कि भाजपा आणि शिवसेना युती करा. मी मुख्यमंत्री होणार होतो?, पाच वेळा त्यांना सांगितले. खुर्चीसाठी एवढा का मोह झाला?, सत्तेसाठी काँग्रेस बरोबर गेले. मी जे केले ते सत्तेसाठी, खुर्चीसाठी नाही.
ते पुढे म्हणाले, औरंगजेबाचे उदात्तीकरण कोणी करता कामा नये, आपल्या राज्याला लागलेला तो एक कलंक आहे. अमेरिकेने ओसामा बिन लादेनचे थडगे होऊ नये म्हणून त्याला समुद्रात बुडवले. औरंगजेबाची कबर काँग्रेसच्या काळातील राहिली आहे, काँग्रेसने संरक्षित केले. नागपूरची घटना दुर्दैवी असून ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे, त्यांचा रोखठोक हिशोब केला जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.