शिवाजी महाराजांच्या सुरतेवरील स्वारीची पालिकेच्या लुटीशी तुलना!

उद्धव ठाकरेंचे अजब वक्तव्य

शिवाजी महाराजांच्या सुरतेवरील स्वारीची पालिकेच्या लुटीशी तुलना!

उद्धव ठाकरे यांनी शनिवारी एक ट्विट करत मुंबई महानगर पालिकेतील तथाकथित लुटीवर आपला राग काढला. पण ते करताना त्यांनी थेट शिवाजी महाराजांच्या सुरतेच्या स्वारीचा उल्लेख सुरतेची लूट असा केला. शिवाय, त्याची तुलना त्यांनी मुंबई महानगरपालिकेतील वरच्या दलालांकडून सुरू असलेल्या तथाकथित लुटीशीही केली.

 

उद्धव ठाकरे यांनी ट्विट केले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली होती. हे वर बसलेले दलाल महाराष्ट्राची राजधानी लुटत आहेत. मुंबई मॉडेलचे जगात कौतुक होत आहे पण नालायकांना त्याचं कौतुक नाही. उद्धव ठाकरे यांनी केलेली ही तुलना शिवाजी महाराजांचा अपमानच आहे. कारण त्यांच्या एखाद्या वक्त्व्याचा कुणी विपर्यास केलेला नाही किंवा त्याचा कुणी चुकीचा अर्थ काढलेला नाही. उद्धव ठाकरे यांनी थेट आपल्या ट्विटमधूनच ती तुलना करून शिवाजी महाराजांच्या सुरतेवरील स्वारीची अवहेलना केलेली आहे.

 

आज कुठे आहेत शिवाजी महाराजांच्या अपमानावरून राजकारण करणारे? अमोल मिटकरी, जितेंद्र आव्हाड यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर किती चिखलफेक केली होती. महाराजांचा अपमान झाल्याबद्दल कोश्यारी यांनी माफी मागायला हवी यासाठी आंदोलने केली गेली. कोश्यारी यांचे पुतळे जाळले गेले, त्यांच्या फोटोला काळे फासले गेले, त्यांच्या बॅनरवर जोडे मारले गेले. ते सगळे आंदोलक आता कुठे आहेत? आता छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान नाही का? उद्धव ठाकरे यांना हा इतिहास माहीत नाही का? जर माहीत नसेल तर मग त्यांनी शिवाजी महाराजांच्या या स्वारीची तुलना महानगरपालिकेतील एका त्यांच्या दाव्यानुसार झालेल्या लुटीशी करायची?

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर जी स्वारी केली, त्यात मुघलांना जरब बसवणे हाच उद्देश होता. शिवाय, या स्वारीतून मिळालेली रक्कम महाराजांनी स्वतःच्या ऐशोआरामासाठी, स्वतःचे इमले उभारण्यासाठी जमा केली नाही तर ती स्वराज्याच्या उभारणीसाठी खर्च केली. गडकिल्ले उभारले, स्वराज्याला शस्त्रसज्ज केले, सैन्य उभे केले. मग त्याला लूट कसे काय म्हणता येईल. महाराज काही लुटारू नव्हते. तर ज्या मुघलांनी आक्रमण करत मंदिरे लुटली, रयतेकडून कर वसूल केला, त्यातून त्यांनी आपली घरे भरली. त्याच मुघलाचा हा बाजार सुरतेत भरत होता. त्यात धनदौलत खरेदीविक्री केली जात होती. जी देशातील जनतेला लुटून मिळविली होती. तीच महाराजांनी त्यांच्याकडून हिसकावून घेतली आणि स्वराज्याच्या रयतेसाठी उपयोगात आणली तर त्यांना आपण लुटारू म्हणणार की काय? पण उद्धव ठाकरे यांनी ही भाषा अगदी सहज वापरली. तेव्हा त्यांना आपण शिवाजी महाराजांचा अपमान करत आहोत, याचे भान राहिले नाही.

हे ही वाचा:

पाकिस्तानमध्ये पुन्हा अल्पसंख्याकांवर अत्याचार; दोन शीखांना घातल्या गोळ्या !

असुद्दिन ओवेसींच्या रॅलीत ‘औरंगजेब’ अवतरला

अधिक काम करण्यासाठी ‘केदारनाथ’ यात्रेतील ”खेचरांना देतात गांजा” !

आगामी आंतरराष्ट्रीय आव्हानांसाठी आघाडीचे ३९ हॉकीपटू झाले सज्ज

ज्या शिवाजी महाराजांच्या नावावर उद्धव ठाकरे आतापर्यंत राजकारण करत आले, विविध योजना शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू करण्यात आल्या, पक्षाचे नाव शिवाजी महाराजांच्या नावातून प्रेरणा घेऊन निर्माण झाले, त्याच शिवाजी महाराजांबद्दल आपण चुकीचा इतिहास मांडतो आहोत, हे उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यायला हवे होते. पण त्यांनी मोदीद्वेषापायी, भाजपाच्या तिरस्कारापायी शिवाजी महाराजांच्या सूरत स्वारीचा उल्लेख लूट असा करायलाही मागेपुढे पाहिले नाही.

बरे हे करताना उद्धव ठाकरे यांनी त्याची तुलना थेट मुंबई महानगरपालिकेतील तथाकथित दलाल कशी लूट करत आहेत, त्याच्याशीही करून टाकली. त्याचीही त्यांनी तमा बाळगली नाही. या मुंबई महानगरपालिकेत सध्या लूट चालू आहे, असे म्हणणारे उद्धव ठाकरे गेल्या २५ वर्षांतील आपल्या सत्ताकाळात मुंबई महानगरपालिकेची कशी लूट सुरू होती, हे विसरले असावेत. या २५ वर्षांत मुंबई महानगरपालिकेत कंत्राटांतून कसा मलिदा खाल्ला गेला, कशी मलई ओरपली गेली, याचे त्यांना विस्मरण झाले का? यासंदर्भात आज अनेक आरोप झालेले आहेत, अनेक चौकश्या सुरू आहेत. त्या काळातील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ईडीच्या धाडी पडल्या आहेत, त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून बरीच माहिती समोर येते आहे. मग असे असताना लूट ही आताचीच आहे आणि त्यांच्या सत्ताकाळात जणू काही रामराज्य होते, असे म्हणणे हे हास्यास्पद ठरते.

तसे जर रामराज्य असते तर मुंबईची जी आजची दशा आहे, ती तशी नसती. रस्ते, नालेसफाई, प्रदूषण, अनधिकृत बांधकामे, गटारे, फेरीवाले, कचरा, पावसाळ्यातील पाणी तुंबण्याच्या घटना अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे सापडली असती. पण दुर्दैवाने त्याची उत्तरे कधीही सापडली नाहीत. उलट या समस्या वर्षानुवर्षे तशाच राहिल्या. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता महापालिकेत महाराष्ट्राच्या राजधानीची लूट सुरू आहे, असे जे विधान केले आहे, ते आपल्या काळातील पापांवर पांघरूण घालण्यासारखे आहे. उद्धव ठाकरे हे लपविण्यासाठी थेट शिवाजी महाराजांच्या सुरतेच्या स्वारीलाच पुढे करत आहेत. पण त्यामुळे महाराजांच्या या पराक्रमाचा अपमान होतो आहे. उद्धव ठाकरे यांसंदर्भात माफी मागतील का, शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याबद्दल माफीची अपेक्षा बाळगणाऱ्यांनी आता महाराजांच्या अपमानाची माफी मागावी. जनता त्याची वाट पाहात आहे.

Exit mobile version