‘शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही’

‘शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही’

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या १००व्या वर्षी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे. शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. फडणवीस यांनी बाबासाहेब पुरंदरे आणि त्यांच्या भेटीची छायाचित्रे ट्विट करत आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांच्या जाण्याने मनाला अत्यंत वेदना होत आहेत. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण डोळ्यासमोर येत आहेत, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. ‘तब्बल तीन पिढ्यांना त्यांच्याकडून शिवचरित्र ऐकायला आणि वाचायला मिळाले, हे आमच्या पिढीचे भाग्यच!’ असेही ट्विट फडणवीसांनी केले आहे.

हे ही वाचा:

कार्तिकी एकादशीला माऊलीची आणि लेकरांची भेट होणार…

महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

शिवप्रेमींची बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनाला अलोट गर्दी; राजकीय नेत्यांनीही घेतले दर्शन

बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनावर शरद पवारांची वादग्रस्त प्रतिक्रिया

बाबासाहेबांची सर्वांत मोठी ओळख कोणती तर त्यांनी कधीही इतिहास मोडून-तोडून सांगितला नाही. त्यांनी इतिहासावर निस्सिम प्रेम केले, श्रद्धाही जोपासली. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रत्येक तारीख, प्रसंग मुखोदगत असलेले बाबासाहेब होते. शिवकाळ हाच त्यांचा श्वास आणि प्राण होता.

‘ध्येयाप्रति समर्पित व्यक्तिमत्त्व, वेळ- शब्दांचे पक्के, सतत राष्ट्रनिर्माणाचा विचार, संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी कठोर परिश्रम असे बाबासाहेब पुरंदरे आता पुन्हा होणे नाही. एक महान कर्मयोगी आपल्यातून निघून गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ॐ शान्ति’, असे ट्विट करत फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनीही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. शिवरायांसाठी आयुष्य वाहून घेणारे, इतिहासकार, नाटककार, लेखक अशी विविध क्षेत्रे आपल्या प्रतिभेने गाजवणारे आणि त्यांना अजरामर करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाण्याने केवळ साहित्य क्षेत्रातच नाही तर इतिहास, नाट्य क्षेत्राचीही मोठी हानी झाली आहे, असे दरेकर यांनी म्हटले आहे. केवळ शिवभक्तच नाही तर इतर सर्व क्षेत्रातील कोणीही त्यांना कधीही विसरू शकणार नाहीत. आपल्या कार्यकर्तृत्वाने ते अमर झाले आहेत. अशा थोर बाबासाहेबांना माझ्यातर्फे विनम्र श्रद्धांजली, अशा शब्दात दरेकरांनी शोक व्यक्त केला आहे.

Exit mobile version