सावधान!! इथे यूटर्न नाही!

सावधान!! इथे यूटर्न नाही!

चुकीच्या फलकामुळे अपघातांना निमंत्रण

पश्चिम द्रुतगती मार्गावर कांदिवलीहून दहिसरच्या दिशेने जाताना श्रीकृष्ण कॉम्प्लेक्सजवळ युटर्नचा फलक चुकीचा लावला आहे. फलक चुकीच्या ठिकाणी लावल्यामुळे वाहन चालकांचा गोंधळ होऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युटर्नचा रस्ता ओलांडल्यानंतर दहिसरकडून बोरिवलीमध्ये वळणाऱ्या गाड्या ज्या ठिकाणी वळतात त्याच्या अलीकडे हा फलक लावण्यात आला आहे. त्यामुळे फलक वाचून वाहने विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाड्यांच्या रस्त्यावरून वळवण्याच्या प्रयत्न होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

रोडमार्चच्या माध्यमातून या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले आहे. गेल्या महिन्याभरापासून हा फलक या भागात असून त्यासंबंधी तक्रारीचा प्रयत्न झाल्याचे स्थानिक आणि रोडमार्च मोहिमेशी संबंधित पंकज त्रिवेदी यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना सांगितले. हा फलक एमएमआरडीएने लावल्याचे दिसत असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधला असता हा फलक वाहतूक पोलिसांच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगितले. वाहतूक पोलिसांशी संपर्क होऊ शकलेला नाही, असे पंकज त्रिवेदी यांनी सांगितले. दहिसरवरून बोरिवलीत येणाऱ्या गाड्यांसाठी हा रस्ता फार रुंद नाही त्यामुळे दोन वाहने समोरासमोर आली की पुरेशी जागा होत नाही.

हे ही वाचा:

एअर इंडियाची घरवापसी निश्चित

सोशल मीडियावर खड्डाखडी; नेटकऱ्यांनी उडविली खिल्ली

आरोग्य विभाग परीक्षेचे काम ‘त्या’ न्यासाकडेच! परीक्षेनंतर म्हणे दंड ठोठावणार

मुंबई विमानतळावर सापडले ५ किलो अमली पदार्थ

या रस्त्यावर पथदिवे नसल्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनांचा अजिबात अंदाज येत नाही, असे स्थानिकांकडून सांगण्यात आले. यापूर्वीही पथदिवे नसल्यामुळे या भागात रात्रीच्या वेळी लूटमार होण्याच्या भीतीने नागरिकांनी स्थानिक नगरसेवक विद्यार्थी सिंग यांना पत्रही दिले होते. मात्र, त्यावर पुढे काही कारवाई झाली नाही, असे स्थानिकांनी सांगितले.

Exit mobile version