जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले!

अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार; शोपियांमध्ये भाजपनेत्याची हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले!

जम्मू काश्मीरमधील अनंतनाग आणि शोपियांमध्ये दोन वेगवेगळ्या गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. शोपियांच्या हीरपोरा परिसरात दहशतवाद्यांनी भाजपनेते आणि माजी सरपंच एजाज अहमद यांच्यावर गोळीबार केला होता. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. तर, अनंतनागमधील पहलगाम परिसरात राजस्थानमधून आलेल्या पर्यटक जोडप्यावर गोळीबार करण्यात आला.

दहशतवाद्यांनी पहलगाममधील एका पर्यटक शिबिराला लक्ष्य केल्याचे सांगितले जाते. त्यात जयपूरमधून आलेले फरहा व तबरेज यांना गोळी लागली. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती समजताच सुरक्षा दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. शोधमोहीम सुरू आहे. तर, शोपियांच्या हीरपोरा परिसरात झालेल्या गोळीबारात भाजपनेते एजाज अहमद जबर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:

कन्हैय्या कुमारला मारणाऱ्यांना कोणताही पश्चात्ताप नाही!

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८०८८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

मुंबईतील वरळी येथे धक्कादायक घटना, कारमध्ये २४ वर्षीय तरुणीवर बलात्कार

मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले की, सहा महिन्यात पाकव्याप्त काश्मीर भारतात

दहशतवादी हल्ल्याचा पीडीपीनेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी निषेध केला. ‘या हल्ल्याची वेळ हा चिंतेचा विषय आहे. दक्षिण काश्मीरमध्ये कोणतेही कारण नसताना निवडणुकीला उशीर करण्यात आला. भारत सरकार सातत्याने येथे परिस्थिती सर्वसामान्य असल्याचा दावा करत असताना, अशा घटना होत असल्याने हा चिंतेचा विषय आहे,’ अशी प्रतिक्रिया मुफ्ती यांनी ‘एक्स’वर दिली.

जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला व उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनीही या हल्ल्यांचा निषेध केला. ‘अशा प्रकारची कृत्ये जम्मू काश्मीरमध्ये शांतता स्थापन करण्यात गंभीर अडथळा ठरत आहेत,’ असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version