एसटीच्या आर्थिक कोंडीने घेतले अजून दोन जीव!

एसटीच्या आर्थिक कोंडीने घेतले अजून दोन जीव!

आर्थिक चक्र बिघडलेल्या एसटी महामंडाळाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस अजूनच बिघडत चालली आहे. एसटी महामंडळ तोट्यात असून कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर दिले जात नसल्यामुळे कर्जाला कंटाळून अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. आतापर्यंत तब्बल २७ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली असून यातून एसटी महामंडळ तोट्यात असल्यामुळे कर्मचाऱ्यांची असलेली भयाण परिस्थिती समोर येत आहे.

बीड आगारातील चालक तुकाराम सानप यांनी सोमवारी (११ ऑक्टोबर) राहत्या घरात कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळच्या वेळी मिळत नसल्यामुळे कुटुंबाच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी हे कर्मचारी कर्ज घेतात आणि नंतर हतबल कर्मचारी आत्महत्येचे पाऊल उचलतात. पंढरपूर आगारातील दशरथ गिड्डे यांनीही आर्थिक समस्यांना कंटाळून आज (१३ ऑक्टोबर) आत्महत्या केली. तुळजापूर जुने बस स्थानक येथेही आज दयानंद गोविंदराव गवळी हे मयत आढळून आल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप आहे.

हे ही वाचा:

अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदी राहण्याचा अधिकार नाही

…म्हणे मावळमधील गोळीबार भाजपाने भडकाविल्यामुळे!

राज्यातील महाविद्यालये सुरू होण्यास सापडला मुहूर्त

‘ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या अकार्यक्षमतेमुळे कोळसा टंचाईचे संकट’

पंढरपूर आगारात सेवेत असलेले दशरथ गिड्डे हे मंगळवारी रात्री त्यांची सेवा बजावून घरी गेले होते. आज पहाटे साडेपाच वाजता त्यांनी आपल्या पत्नीला मॉर्निंग वॉकला जाण्यास सांगितले. पत्नी बाहेर गेल्यानंतर दशरथ यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी फिरून परत आल्यावर दार उघडत नसल्याने त्यांनी आजूबाजूच्यांना बोलावले व दार उघडले असता दशरथ हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. दशरथ गिड्डे हे गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते. कर्जामुळे त्यांच्या हातात केवळ सहा ते सात हजार रुपये पगार येत होता.

एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळत नसल्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. घर चालवत असताना त्यांच्या नाकी नऊ आले आहेत. पहिली आत्महत्या ७ मार्च २०२० रोजी झाली होती त्यानंतर हे आत्महत्यांचे सत्र असेच सुरू असून महामंडाळाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. गिड्डे आणि गवळी यांच्या आत्महत्येनंतर कर्मचाऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Exit mobile version