हिमाचल प्रदेशमध्ये ट्रेकसाठी गेलेल्या दोन मित्रांचा एकत्रच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हिम दुर्घटनेत ठाणे जिल्ह्यामधील डोंबिवली शहरातील दोन जिवलग मित्रांचा मृत्यू झाला. राजेंद्र फाटक (६७) आणि अशोक भालेराव (६६) अशी या मृत पावलेल्या दोन मित्रांची नावे आहेत.
हिमाचल प्रदेशमधील किन्नोर येथे २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या मोठ्या हिमवर्षावात तिघा जणांना प्राण गमवावे लागले. ट्रेकिंगसाठी गेलेले तिघे जण बर्फात गाडले गेले, तर इतर १४ जणांना वाचवण्यात यंत्रणेला यश आले. मृत्युमुखी पडलेल्या तीन जणांमध्ये या दोन डोंबिवलीकर मित्रांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
नुकसान भरपाईच्या शासन यादीतून पश्चिम विदर्भ गायब!
धक्कादायक! वर्गमित्राचीचं केली हत्या!
मोदी सरकार या १३ विमानतळांचे खासगीकरण करणार
समीर वानखेडे बाजूला झाले तर फायदा कोणाचा?
६७ वर्षीय फाटक आणि ६६ वर्षीय भालेराव हे दोघेही त्यांच्या लहानपणापासून चांगले मित्र होते. दोघांनाही ट्रेकिंगची आवड होती. गेले ४० वर्षे दोघे मित्र एकत्र ट्रेकिंग करत होते. वयाची साठी ओलांडल्यावरही त्यांनी त्यांची ही आवड जोपासली होती. मात्र, हिमाचलमधील हा ट्रेक त्यांचा अखेरचा ट्रेक ठरला. त्यांच्या या मृत्यूमुळे परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
मागील काही दिवसांपासून त्यांचे कुटुंबीय त्यांचा शोध लागला का? याकडे डोळे लावून बसले होते. मात्र, या दोन्ही मित्रांचा एकत्रच दुर्दैवी अंत झाला. गेल्या तीन दिवसांपासून कुटुंबीय त्यांचा मृतदेह ताब्यात मिळवण्यासाठी प्रयत्न करत असून संबंधित यंत्रणांना सरकारनेही मदत करावी, अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.