२८ फुटी नटराज मूर्तीचा अडीच हजार किमी प्रवास

तामिळनाडूतून येणारी मूर्ती दिल्लीतील जी२० शिखर परिषदेत स्थानापन्न होणार

२८ फुटी नटराज मूर्तीचा अडीच हजार किमी प्रवास

जी- २० शिखर परिषदेच्या स्थळासमोर ठेवण्‍यासाठी विशिष्ट रूपातील २८ फूट उंच नटराजाची मूर्ती तमिळनाडूतून एका ट्रकमधून दिल्लीत आणली जात आहे. ही जगातील सर्वांत उंच मूर्ती असल्याचा दावा सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. दोन दिवसांच्या, अडीच हजार किमीच्या या प्रवासासाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार करण्यात आला आहे.

ही मूर्ती आणण्यासाठी दोन चालकांव्यतिरिक्त, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे किमान चार अधिकारी ट्रकच्या ताफ्यासोबत आहेत. त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. हा प्रवास निर्धोकपणे आणि सुरळीत, कोणत्याही अडचणींशिवाय व्हावा आणि ही मूर्ती व्यवस्थित नियोजित ठिकाणी पोहोचावी, यासाठी या मार्गावरील सर्व राज्य प्राधिकरणांना आणि त्यांच्या संबंधित टोलनाक्यांना मंत्रालयातर्फे सूचना देण्यात आल्या आहेत.

या मूर्तीने होस्कोटे, देवनहल्ली, कुरनूल, आदिलाबाद, नागपूर, सिवनी, सागर, ललितपूर, ग्वाल्हेर आणि आग्रा या शहरांतून प्रवास केला आहे. १९ टन वजनाची ही कलाकृती दिग्गज शिल्पकार देवसेनापती स्तपाठी यांच्या मुलांनी तामिळनाडूच्या स्वामीमलाई जिल्ह्यात साकारली आहे. जी- २० शिखर परिषद दिल्लीत उभारल्या जाणाऱ्या ‘भारत मंडपम’ मधील प्रमुख ठिकाणी ही मूर्ती स्थानापन्न केली जाईल.

हिंदू देव शिवाचे दैवी वैश्विक नर्तक म्हणून नटराजाला मानले जाते. शिवशंकर जे नृत्य सादर करतात, त्याला तांडव म्हणतात. शैव धर्मातील सर्व प्रमुख हिंदू मंदिरांमध्ये ही मूर्ती आहे. हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणून वापरले जाते. तसेच, हिंदू कलेच्या उत्कृष्ट चित्रांपैकी एक म्हणूनही या नटराजाची गणना होते. ही मूर्ती ४ सप्टेंबरपर्यंत नियोजित स्थळी स्थानापन्न केली जाईल.

हे ही वाचा:

आशिया चषकावर भारतीय महिला हॉकी संघाने कोरले नाव

प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूकीत महाराष्ट्र अव्वल

अफगाणिस्तानात आता हिजाब व्यवस्थित न घातल्यास महिलांना उद्यानबंदी

‘इंडिया’ गटाला धक्का? ‘आप’ बिहार विधानसभा निवडणूक लढवणार

पुतळ्याची खरी उंची २२ फूट आहे आणि तिचा पाया सहा फूट आहे. अशा तऱ्हेने या मूर्तीची उंची २८ फुटांपर्यंत होते. ही मूर्ती श्रीकांत स्तपाठी, त्यांचे भाऊ राधाकृष्ण स्तपाठी आणि स्वामीनाथ स्तपाठी यांनी साकारली आहे. ही मूर्ती सोने, चांदी, शिसे, तांबे, कथील, पारा आणि लोखंडापासून बनवण्यात आली आहे. मूर्ती साकारण्यासाठी वापरलेल्या धातूला विशिष्ट आकार देण्यासाठी ते एक हजार अंश डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानावर वितळवले गेले. ‘२० फेब्रुवारी रोजी अशा प्रकारे मूर्ती साकारण्याच्या सूचना संस्कृती मंत्रालयाने दिल्या होत्या. त्यानंतर ही मूर्ती पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला,’ असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Exit mobile version