चेन्नई सुपर किंग्जच्या पिवळ्या जर्सीमध्ये अजिंक्य रहाणे नव्या अवतारात दिसत आहे. अजिंक्य रहाणेने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ईडन गार्डन्सवर दुसरे अर्धशतक झळकवले आहे. त्याने अवघ्या २९ चेंडूत ५ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने नाबाद तुफानी ७१ धावा केल्या. या सामन्यानंतर अजिंक्य म्हणाला की, तो आपल्या फलंदाजीचा आनंद घेत आहे, परंतु अजूनही सर्वोत्तम कामगिरी करणे बाकी आहे.
यापूर्वी त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध ७१ धावांची खेळी केली होती. याशिवाय रहाणेने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि राजस्थान रॉयल्सविरुद्धही ३० पेक्षा अधिक धावा केल्या. रहाणेने आयपीएलच्या या मोसमात आतापर्यंत १९९.०४ च्या सरासरीने २०९ धावा केलेल्या आहेत. केकेआरविरुद्ध शानदार खेळी करणाऱ्या रहाणेला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
एकेकाळी आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवलेल्या अजिंक्य रहाणेची २०२३च्या लिलावात बेस प्राइस ५० लाख इतकी होती. लिलावात नाव पुकारल्यानंतर कोणीही बोली लावली नाही. चेन्नई सुपर किंग्जने बेस प्राइससह त्याला संघात सामावून घेतले. आता अजिंक्य जो काही पराक्रम करतो आहे त्याचा विचार ना धोनीने केला असेल ना चेन्नई संघ व्यवस्थापनाने.
बराच काळ भारतीय संघाबाहेर असलेल्या अजिंक्य रहाणेने हार मानली नाही. संघाबाहेर असल्यापासून त्याची बॅट खूप काही बोलून जात आहे. या आयपीएलमध्ये तो पूर्णपणे नव्या अवतारात दिसत आहे. गेल्या तीन मोसमात कधीही १०५ च्या वर स्ट्राईक रेट गाठू न शकलेला अजिंक्य यावेळी पाचव्या गियरमध्ये फलंदाजी करत प्रतिस्पर्धी गोलंदाजांची पिसे काढतोय.
हे ही वाचा:
साशानंतर आता उदय चित्त्याने घेतला जगाचा निरोप
आयसीसीने सांगितल्या सचिनच्या कारकीर्दीतल्या त्या १० आठवणी
वीरेंदर सेहवागने सचिनला शीर्षासन करून म्हटले हॅप्पी बर्थडे पा जी!
विश्वास नाही बसत?… गुजरातच्या पांचोट गावातील कुत्रे आहेत करोडपती !
काही ठराविक फलंदाजच ३६० डिग्री शॉट खेळतात एबी डिविलियर्स, जोस बटलर, सूर्यकुमार यादव, ग्लेन मॅक्सवेल हे खेळाडू यात माहीर आहेत. मात्र कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या अजिंक्यने एकापाठोपाठ भन्नाट शॉट मारून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.