छत्रपती शिवाजी महाराजांचे स्त्रीदाक्षिण्य

आज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती! छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, त्यांचे कार्य आपल्याल आजही प्रेरणादायक आहेत. आजच्या महाराष्ट्रात स्त्रिया असुरक्षित असताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्त्रीदाक्षिण्य दर्शविणारा हा शुभंकर अत्रे यांचा लेख वाचा फक्त न्युज डंका वर

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्त्रीदाक्षिण्य

दक्षिणदिग्विजयाच्यावेळी महाराज आणि त्यांचे सावत्र भाऊ एकोजी/व्यंकोजी राजे यांत वितुष्ट आले. महाराजांचे न ऐकता एकोजीने त्याच्या मुसलमानी सल्लागारांचा सल्ला ऐकून महाराजांशी विनाकारण भांडण ओढून घेतले, आणि ‘वालगोंडपुर’ इथे सरसेनानी हंबीरराव मोहित्यांकडून तोंडघशी पडला. हे महाराजांना महाराष्ट्रात समजल्यावर त्यांनी बंधूस समजूतीचे पत्र लिहिले. ते वाचून एकोजी उदास झाला, तेंव्हा त्याची धर्मपत्नी दीपाबाई हीने त्यास राजांना शरण जाण्याचा सल्ला दिला, त्याप्रमाणे एकोजीने रघुनाथपंतांकडे (राजांनी दक्षिणेतून महाराष्ट्री आल्यावर दक्षिणी कारभार पाहण्यासाठी रघुनाथपंत हणमंते, हंबीरराव मोहिते आणि शाहाजीराजांचा दासीपुत्र संताजी भोसले हे ठेवले होते) लीनतेचे पत्र पाठवून तह करण्याची इच्छा व्यक्त केली. रघुनाथपंतांच्या मध्यस्थीने तो तह सुरू झाला, त्यासंबंधी मान्यतादर्शक पत्र महाराजांनी रघुनाथपंतांना लिहीले, त्यातला एक भाग असा-

‘आमची भावजई शहाणी, पुढील होष्यमाण जाणून विचारावरी आणिलें; उत्तम झालें’
व त्या तहातले १५वे कलम असे-

‘बेंगळूर, होसकोट व सिलेकोट हे दोन लाखांचे प्रांत आम्ही (महाराजांनी) जिंकले असून, ते पांच लाखांपर्यंत उत्पन्नास येतील ते आम्ही चिरंजीव दीपाबाई एकोजीचें कुटुंब यांस चोळीबांगडीसाठीं दिले आहेत. त्यांजवर देखरेख एकोजीनें राखावी, परंतु हक्क सांगू नये. हे प्रांत मुलीच्या वंशाकडे चालावे; व सौभाग्यवती देतील त्यांनी खावेत.’

ही गोष्ट आज, २०१७ साली विशेष नाही. परंतु, १६७८-७९ साली, जेंव्हा आपल्या संस्कृतीत पुरूषप्राधान्य ओसंडून वाहत होतं, त्या काळी महाराजांनी दीपाबाईंच्या शहाणपणाबद्दल तिचे केलेले कौतुक, आणि चोळीबांगडीसाठी दिलेला प्रदेश, ज्याच्यावर तिचा म्हणजे तिचाच हक्क राहील, व तो हक्क तिच्या मुलीकडे जाईल आणि एकोजी ज्याच्यावर फारफारतर देखरेख करू शकतो, अशी स्पष्ट आणि खणखणीत आज्ञा वाचली, की महाराजांची वैचारिक पातळी त्यांच्या काळाच्या कैक शतके पुढे का होती, हे लक्षात येतं आणि भगव्या झेंड्याखाली सकल जनता सुखी का होती याचेही सुस्पष्ट उत्तर मिळते!

-शुभंकर सुशील अत्रे

संदर्भ: मराठी रियासत खंड-१ पृ.क्र. ३२७ व ३२९

Exit mobile version