शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर पाटील यांचे निधन

शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर पाटील यांचे निधन

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर पाटील यांचे निधन झाले आहे. बुधवार ४ ऑगस्ट रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण शेगाव मधील वातावरण शोकाकुल झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवशंकर भाऊ पाटील हे आजारी होते. त्यांच्या राहत्या घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण मंगळवारपासून अचानक त्यांची तब्येत खालावली आणि बुधवारी संध्याकाळच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

त्यांच्या घराजवळ असलेल्या शेतातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. कोरोना नियमावलीचे पालन करूनच अंत्यविधी पार पडणार आहेत. त्यामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी शेगाव येथे कोणीही गर्दी करू नये असे आवाहन शेगाव संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. तर कोरोना निर्बंधांचा विचार करता मोजक्या भक्तांनाच शिवशंकरजींच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

रुग्णालयांच्या आरोग्याचे काय?

‘या’ दिवशी राम मंदिर भाविकांसाठी उघडणार

उंटाच्या चालीने चालणारी एसटी पाहिलीत का?

ज्यांनी शाळा उद्ध्वस्त केली त्यांनीच उभारली!

शिवशंकर पाटील यांच्या निधनाबद्दल समाजातील विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात असून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे मंत्री अशोक चव्हाण, भाजपा नेते अतुल भातखळकर आदींनी ट्विटरच्या माध्यमातून शिवशंकर पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

“संस्थानचे पावित्र्य राखण्याबरोबरच संस्थानाला सामाजिक कार्याची जोड देत त्यांनी सर्वार्थाने सामाजिक व धार्मिक कार्यात आदर्श निर्माण केला. एक व्रतस्थ कर्मयोगी म्हणून शिवशंकर भाऊ कायम स्मरणात राहतील” असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

तर “शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाने एका सेवाव्रतीला मुकलो..” असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“आयुष्यभर निस्वार्थपणे संत गजानन महाराजांची सेवा करणारे ऋषितुल्य व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.” असे मत मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी देखील “शेगाव संस्थानाच्या कार्यविस्तारात शिवशंकर पाटील यांची भूमिका कायमच मोलाची ठरली.” असे म्हणत ट्विट केले आहे.

Exit mobile version