आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी शनिवारी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात चित्रपटातील भूमिकेसाठी झालेल्या ऑडिशनमध्ये भाग घेतला होता. त्यांना चित्रपटांमध्ये करिअर घडवता यावे, यासाठी राज्य पोलिसांच्या पुढाकाराने या ऑडिशनचे आयोजन मराठी अभिनेत्री तृप्ती भोईर आणि चित्रपट निर्माते विशाल कपूर यांनी केले होते.
हा चित्रपट गडचिरोलीच्या आदिवासींच्या परंपरेवर आधारित आहे. गडचिरोली पोलिस मुख्यालयाजवळील नवजीवन कॉलनी येथे झालेल्या या ऑडिशनला महिला आणि पुरुष दोघांनी हजेरी लावली होती. उपस्थितांना तृप्ती भोईर आणि विशाल कपूर यांच्याकडून व्हॉईस मॉड्युलेशन आणि अभिनयाचे प्रशिक्षणही देण्यात आले.
हे ही वाचा:
विरोधी पक्षांच्या एकजुटीनेही भाजपचे नुकसान नाही!
पाकिस्तानमध्ये पुन्हा अल्पसंख्याकांवर अत्याचार; दोन शीखांना घातल्या गोळ्या !
इजिप्तच्या दौऱ्यात महिलेने ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’ गाणे गात केले मोदींचे स्वागत
कोविड घोटाळा प्रकरणी ईडीच्या हाती लागली महत्त्वाची डायरी
‘आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना चित्रपटांमध्ये काम करण्याची आणि अभिनयात त्यांचे करिअर करण्याची संधी मिळावी, यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांना मदत होईल. स्वत:साठी एक नवीन ओळख निर्माण करता येईल, ’ असे गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.
तृप्ती भोईर आणि विशाल कपूर यांनी अगडबंब, तुझ्या माझ्या संसाराला काय हवे आणि टूरिंग टॉकीज यांसारख्या बहुप्रशंसित मराठी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. गडचिरोली या आदिवासीबहुल जिल्ह्यामध्ये एक जुनी परंपरा आहे. ज्यात मासिक पाळी असलेल्या महिलेला झोपडीत राहावे लागते. ही झोपडी तिच्या घराबाहेर बांधली जाते. त्याला ‘कुमराघर’ असे म्हटले जाते. या चित्रपटाचे नावही याच परंपरेनुसार ‘कुमराघर’ ठेवण्यात आले आहे.