भारतातील १३ गावांमध्ये पहिल्यांदा फडकणार ‘तिरंगा’

स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यानिमित्त देशभरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

भारतातील १३ गावांमध्ये पहिल्यांदा फडकणार ‘तिरंगा’

स्वातंत्र्य दिनाची तयारी जोरात सुरू आहे. १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण देश ७८ व्या स्वातंत्र्याच्या जल्लोषात तल्लीन होणार आहे. जेव्हा जेव्हा स्वतंत्र भारताचा उल्लेख होतो तेव्हा त्याच्याशी संबंधित अनेक रंजक कथा डोळ्यासमोर येतात. अशाच प्रकारच्या १३ गावांबद्दल माहिती समोर आली आहे, ज्याठिकाणी आतापर्यंत कधीच तिरंगा फडकला नाही. मात्र, आता या १३ गावांमध्ये पहिल्यांदाच तिरंगा फडकवला जाणार आहे. ही गावे छत्तीसगडमधील असून नक्षल प्रभावामुळे येथे तिरंगा फडकवला गेला नव्हता.

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बस्तरमधील या १३ गावांमध्ये स्वातंत्र्यदिनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या ७ महिन्यांत या गावांमध्ये सुरक्षा दलांच्या नवीन छावण्या तयार करण्यात आल्या आहेत. या छावण्या सुरू झाल्याने या भागांतील विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त नेरलीघाट (दंतेवाडा जिल्हा), पानिडोबीर (कांकेर), गुंडम, पुटकेल आणि छुटवाही (विजापूर), कस्तुरमेट्टा, मसपूर, इराकभट्टी आणि मोहंडी (जि. नारायणपूर), टेकलगुडेम, पूर्ववर्ती, लखापाल आणि पुलनपद (सुकमा) गावात तिरंगा फडकवला जाणार आहे. अधिकारी सुंदरराज म्हणाले की, गेल्या प्रजासत्ताक दिनानंतर या ठिकाणी सुरक्षा छावण्या उभारण्यात आल्या होत्या. नवीन छावण्या उभारल्यानंतर या परिसराला नवी ओळख मिळाली आहे.

दरम्यान, छत्तीसगड सरकारने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी राजधानी रायपूरसह सर्व जिल्ह्यांमध्ये तयारी पूर्ण केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री विष्णुदेव साई गुरुवारी सकाळी रायपूरच्या पोलीस परेड मैदानावर राष्ट्रध्वज फडकवतील. ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री अरुण साओ बिलासपूरमध्ये, विजय शर्मा जगदलपूरमध्ये (बस्तर जिल्ह्याचे मुख्यालय) आणि केंद्रीय राज्यमंत्री तोखान साहू हे मनेंद्रगड-चिरमिरी-भरतपूर जिल्ह्यात राष्ट्रध्वज फडकवतील.

हे ही वाचा..

राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा

लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला महाराष्ट्रातील मान्यवर राहणार उपस्थित

राज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ प्रदान

आशा पारेख यांना स्व. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार

राज्यातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात इतर मंत्री आणि आमदार सहभागी होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्वातंत्र्यदिनाचा सोहळा लक्षात घेऊन राज्यात विशेषत: माओवादग्रस्त भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Exit mobile version