मुसळधार पाऊस, रेल्वे ट्रॅकवर पाणी, भिंती, झाडे कोसळण्याच्या घटना, रस्त्यांवरून पाण्याच्या नद्या वाहात असल्याची स्थिती असे चित्र बुधवारी मुंबई आणि महाराष्ट्रात दिसत होते. मुंबईत अनेक ठिकाणी या धुवाँधार पावसामुळे पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या. मुंबईत झाड अंगावर पडल्यामुळे दोन जण मृत्युमुखी पडल्याचेही वृत्त आहे. बुधवारी मुंबईत विलेपार्ले, लोअर परळ, अंधेरी याठिकाणी पावसाने थैमान घातले. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता.
यावेळी नैऋत्य मोसमी पावसाला विलंब झाला. त्याआधी बिपरजॉय हे वादळ आल्यामुळे त्याचा फटका पावसाला बसला, पण आता पावसाने जोर धरला आहे. २०१९ला वायू या चक्रीवादळामुळे मान्सूनवर परिणाम झाला होता. मालाडमध्ये कौशल जोशी यांचा झाड पडून मृत्यु झाला तर गोरेगाव येथील एमजी रोडला ३० वर्षीय व्यक्तीचा मृत्यु झाड पडल्यामुळे झाला आहे.
हे ही वाचा:
सायकल चोरीवरून करण्यात आलेल्या तबरेझ हत्येप्रकरणात १० जण दोषी
ईडीचे माजी उपसंचालक सचिन सावंत यांना ईडीकडून अटक
डॉक्टरांचा सल्ला झुगारून दुखापतग्रस्त ममता बॅनर्जी घरी परतल्या
मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळील रस्ता खचला
ठाण्यात पाणी तुंबण्याच्या अनेक घटना घडल्या. रेल्वे ट्रॅकवरही पाणी जमा झाल्यामुळे लोकल रेल्वेची गती मंदावली. सीवूड नवी मुंबई येथे एनआरआय कॉम्प्लेक्समध्ये पार्किंगची भिंत कोसळली आणि ती कॉम्प्लेक्समधील कारवर पडली. दहिसर, बोरिवली भागात पाणी तुंबल्यामुळे बसमार्ग बदलण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. ठाण्यात मासुंदा तलावाजवळ एक मोठे झाड कोसळल्याने रस्ता बंद झाला.
भांडुपमध्येही रस्त्यांवर प्रचंड पाणी तुंबल्यामुळे गाड्या अडकून पडल्या. बोरिवली स्टेशनजवळ गुडघाभर पाणी तुंबल्यामुळे प्रवाशांना स्टेशनला जाणे जिकिरीचे बनले. सकाळी ८ ते १ वाजेपर्यंतच्या काळात बोरिवलीत ९८ मिमी पाऊस झाला तर भांडुप, दिंडोशी येथे ८९ मिमी पावसाची नोंद झाली. विक्रोळीत ८६ मिमी, मुलुंड ८५ मिमी, कुलाब्यात ५६ मिमी, दादरला २८ मिमी, वडाळ्यात २९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ठाण्यात तब्बल १०५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. मुंबईचे पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मुंबईच्या स्थितीची पाहणी केली. मिठी नदीच्या परिसरात भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी त्यांनी केली.