हवामान बदलाची चर्चा सुरू असताना हरितपट्टा जपण्याची नितांत गरज वर्तविली जात आहे. एकीकडे हवामान बदलासाठी योजना आखायच्या तर, दुसरीकडे झाडे बेमालूमपणे छाटायची असे सध्याच्या घडीला मुंबईत सुरू आहे.
नुकतीच दादर येथील शिवाजी पार्क येथील गाड्यांना मार्ग सापडावा म्हणून काही झाडे कापण्यात आली. शिवाजी पार्कजवळ केळुसकर मार्गाजवळ झाडे कापण्याची घटना घडलेली आहे. पुत्रंजीवाचा वृक्ष तोडण्यात आल्यानंतर नागरिकांनी यासंदर्भात महापालिकेच्या उद्यान विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनंतर पालिकेकडून थातूर मातूर असे कारण देण्यात आले आहे. पालिकेकडून दिलेल्या कारणानुसार गाड्यांना जायला जागा हवी म्हणूनच वृक्षतोड करण्यात आली असल्याचे सांगितले गेले आहे. तसेच यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तोडण्यात आलेले हे झाड सुस्थितीत होते. त्या झाडाला कुठेही किड लागलेली नव्हती. त्यामुळे निरोगी झाड तोडल्याबद्दल स्थानिकांनी पालिकेला ईमेलच्या माध्यमातून प्रश्न विचारले.
हे ही वाचा:
कोण होणार अफगाणिस्तान सरकारचा प्रमुख?
निर्बंध असले तरी वाजंत्र्यांना परवानगी द्या!
सोळा वर्षे झाली, निष्क्रियतेची ‘मिठी’ कधी दूर होणार?
ब्राह्मणविरोधी वक्तव्याबद्दल छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना अटक
मुख्य म्हणजे गाड्यांना जायला रस्ता हवा म्हणून विभागातील अजूनही काही वृक्ष तोडले जातील, अशी भीती आता रहिवाशांना वाटत आहे. तोडण्यात आलेले हे पुत्रंजीवाचे झाड ४० वर्षे जुने होते. दादर परिसरामध्ये अनेक झाडे आहेत. परंतु केवळ नव्या प्रकल्पांसाठी झाडांची कत्तल होऊ नये, अशी मागणी आता स्थानिकांमध्ये जोर धरू लागलेली आहे. याआधी झाडे तोडण्याच्या घटना झाल्यावर तक्रारी करण्यात आलेल्या होत्या. परंतु स्थानिकांनी केलेल्या तक्रारीकडे प्रशासनाकडून मात्र कानाडोळा करण्यात आला. वाढीव रस्त्यासाठी आणि विकासाच्या नावाखाली अजून असा किती झाडांचा बळी जाणार हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.