कोरोनाच्या जागतिक महामारीतून जग आता कुठेतरी सावरत आहे असे वाटत असतानाच कोविडच्या नव्या व्हेरियंटने साऱ्या जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या या व्हेरियंटने युरोप आणि आफ्रिका खंडात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक देशांनी कडक पावले उचलली आहेत. भारतातही या नव्या व्हेरियंटचा धोका जाणवू लागला आहे. अशातच महाराष्ट्रात नागरिकांच्या चिंता वाढवणारी एक बातमी पुढे आली आहे.
महाराष्ट्रात दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली या शहरात हा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे सर्वांचेच टेन्शन वाढलेले दिसत आहे. कोरोनाचा हा नवा रुग्ण ओमिक्रोन या नव्या व्हेरियंटचा बळी ठरला आहे का? हे स्पष्ट झालेले नसले तरी देखील खबरदारीचे सर्व उपाय घेतले जात आहेत.
हे ही वाचा:
मथुरामध्ये जमावबंदी! कृष्ण जन्मभूमीवरील मशिदीचा वाद पुन्हा येणार ऐरणीवर?
‘बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासाचे एनसायक्लोपिडीयाच होते’
… म्हणून पंतप्रधान मोदींनी केले मराठमोळ्या तरुणाचे कौतुक
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. २४ नोव्हेंबर रोजी हा व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन या ठिकाणहून डोंबिवली येथे परतला. परत आल्यानंतर नियमानुसार त्याची चाचणी केल्यावर हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. महाराष्ट्रात परतण्या आधी तो दिल्ली येथे आला होता. आफ्रिकेतून आधी दिल्ली आणि मग दिल्ली ते मुंबई असा त्याचा प्रवास झाला आहे.
दरम्यान या रुग्णाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आर्ट गॅलरी आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या रुग्णाच्या भावाची चाचणी केली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर इतर कुटुंबीयांची कोविड चाचणी अद्याप करण्यात आलेली नाही.