शिवालिक हत्ती प्रकल्पाला धोका निर्माण करु शकणारा एक निर्णय घेण्यात आला आहे. शिवालिक हत्ती प्रकल्पात जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प आणि राजाजी व्याघ्र प्रकल्पाचा काही भाग देखील येतो. कोविड-१९ महामारीमुळे या मार्गावरून जाणाऱ्या बंद असलेल्या रेल्वे गाड्यांपैकी १८ गाड्या पुन्हा चालू करण्यात येणार आहेत.
आधी या मार्गावर गाड्यांसाठी ५० किमी प्रतितासांची वेगमर्यादा निश्चित करण्यात आली होती. मात्र आता नव्या नियमानुसार गाड्या याच्यापेक्षा दुप्पट वेगाने जाऊ शकतील. हरिद्वार ते ऋषिकेष दरम्यान ५२ किमीचा लोहमार्ग या राष्ट्रीय उद्यानांतून जातो. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यापैकी १८ किमी लांबीचा पट्टा वन्यजीवांच्य दृष्टीने विशेष संवेदनशील आहे.
राजाजी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक डी.के.सिंग यांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१६ मध्ये उत्तराखंड उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयात रष्ट्रीय उद्यानांत गाड्यांची गती ३० किमी प्रतितास असावी असे सांगितले आहे.
रेल्वेच्या मुरादाबाद विभागाचे विभागीय आयुक्त तरूण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार या संवेदनशील १८ कि.मीच्या पट्ट्यात रेल्वे सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या वेळेत गाड्या ३५ किमी प्रतितास या वेगाने जातील.