सांगली पोलिसांनी शुक्रवारी एका खासगी कोविड केअर सेंटरला भेट दिली आणि या सेंटरला अखेर टाळे ठोकले. मुख्य म्हणजे राज्य शासनाने या रुग्णालयाला परवानगी दिलीच कशी असाच प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या रुग्णालयाला दिलेली परवानगी म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळच होता असे धक्कादायक वास्तव आता समोर आलेले आहे. मुख्य म्हणजे या सेंटरमधील तब्बल ७७ जणांच्या मृत्यूनंतर प्रशासन आता जागे झाले आहे.
कोविड सेंटरच्या मालकास अखेर अटकही झाली. या सेंटरचा सावळा गोंधळ म्हणजे इथे उपचार करणारे वैद्यकीय तज्ज्ञ हे शिकाऊ होते. यासंदर्भात बोलताना सांगली-कुपवाड नागरी प्रमुख नितीन कापडणीस म्हणाले की, कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मूलभूत पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाचा अभाव होता. रुग्णालय मालकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
हे ही वाचा:
हात की सफाई; इकडचा कचरा तिकडे…
अजित पवारांच्या कार्यक्रमात कोविड नियमांना हरताळ
शस्त्रास्त्र साठ्यासह एकाला केले जेरबंद
मुख्यमंत्री लवकरच घराबाहेर पडणार
या रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर नसल्याचे प्रशासनाला आढळले, तसेच या केंद्रातील डॉक्टरही रुग्णांवर उपचार करण्यास पात्र नाहीत असे निदर्शनास आले. वैद्यकीय आणि पॅरामेडिकल कर्मचार्यांनाही कोविड -१९ रूग्णांवर उपचार करण्याचा अनुभव नव्हता अशी माहिती एका वरिष्ठ अधिकारी याने दिली. अधिक बोलताना ते म्हणाले, कोणत्याही कोविड केअर सेंटरला परवानगी दिली जाते तेव्हा, सार्वजनिक आरोग्य विभागाने ठरवलेल्या निकषांची पूर्तता केली जाते.
या कोविड सेंटरमध्ये जादा बिल आकारले गेल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या व इतर अनेक प्रकारच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, नागरी प्रमुखांनी रुग्णालयात भेट दिलेली आणि तिथे अनेक त्रुटी आढळून आल्या. नागरी संस्थेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन यांच्यासह डॉक्टरांच्या पथकाने पडताळणीसाठी रुग्णालयात भेट दिली. त्यानंतर या रुग्णालयाविरोधात ३१ मे रोजी एफआयआर नोंदविण्यात आला.