आंध्र प्रदेशात दोन रेल्वेगाड्या धडकल्या, १४ ठार

विशाखापट्टणम्-रायागादा रेल्वेच्या मोटरमनने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्यामुळे अपघात घडला

आंध्र प्रदेशात दोन रेल्वेगाड्या धडकल्या, १४ ठार

विशाखापट्टणम ते रायागादा येथे जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेची धडक विशाखापट्टणमला जाणाऱ्या पालासा एक्स्प्रेसला बसून झालेल्या अपघातात १४ ठार तर, ५० जण जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे सात वाजता घडली. या अपघातामुळे विशाखापट्टणम- पालासा पॅसेंजरचे दोन मागचे डबे आणि विशाखापट्टण्-रायागादा पॅसेंजरचे इंजिन रुळांवरून घसरले.
प्राथमिक तपासानुसार, हा अपघात मानवी चुकीने झाल्याचा संशय आहे. विशाखापट्टणम्-रायागादा रेल्वेच्या मोटरमनने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातर्फे ‘एक्स’वर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. ‘आलामांडा आणि कांटापल्ले सेक्शन दरम्यानच्या या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्ण्व यांच्याशी चर्चा केली असून या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आहे,’ असे यावर नमूद करण्यात आले आहे. ‘अपघातग्रस्तांना प्रशासनातर्फे सर्वोतपरी मदत दिली जात आहे. मृतांच्या नातेवाइकांप्रती संवेदना व्यक्त करून जखमींच्या प्रकृतींना लवकर आराम मिळावा, यासाठी पंतप्रधानांनी प्रार्थना केली,’ असेही यात नमूद करण्यात आले आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व्हाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनीही त्वरित मदतकार्य हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत. जास्तीत जास्त रुग्णवाहिका विशाखापट्टणम् आणि जवळच्या जिल्ह्यांतून घटनास्थळी पाठवल्या जात आहेत. जवळच्या रुग्णालयांत दाखल झालेल्या जखमींना चांगले वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी सर्व प्रकारच्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
मदतकार्याला वेग येण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सरकारच्या आरोग्य, पोलिस आणि महसूल विभागाशी समन्वय साधून ताबडतोब पावले उचलावीत, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. तर, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मदतकार्य अद्याप सुरूच असून सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आल्याचे सांगितले आहे.

 

हे ही वाचा:

केरळमधील बॉम्बस्फोटमालिकेचा २० सदस्य करणार तपास

आमदार अपात्रतेप्रकरणी दोन महिन्यांत निकाल द्या!

नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न!

गुगल मॅपकडून ‘भारत’ आणि ‘इंडिया’ दोन्ही शब्दांना ‘दक्षिण आशियातील एक देश’ म्हणून मान्यता

तसेच, पंतप्रधानांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. मी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली आहे. परिस्थिती आता नियंत्रणात आहे, असेही त्यांनी सांगितले.पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमधून मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दोन लाख तर, जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर, मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची तर, जखमींना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशातील जखमींना दोन लाख तर, अन्य राज्यांतील जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये दिले जातील.

Exit mobile version