चाकरमानी निघाले गावाला; वाहतूक कोंडीचा ताप डोक्याला

मुंबई- गोवा महामार्गावर जबरदस्त वाहतूक कोंडी

चाकरमानी निघाले गावाला; वाहतूक कोंडीचा ताप डोक्याला

गणेशोत्सवासाठी मुंबई- पुण्याहून चाकरमानी कोकणात जाण्यासाठी निघाले आहेत. कोकणात गणेशोत्सवाला वेगळे महत्त्व असून मोठ्या उत्साहात दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक गणपतीसाठी आपापल्या गाव जात असतात. मात्र, गावी जाण्यासाठी निघालेल्या या भाविकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. रस्त्यांवरील खड्यांमुळे त्रस्त असलेल्या भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे तर रेल्वेने निघालेल्या प्रवाशांनाही गाड्यांना होत असलेल्या विलंबाचा त्रास सहन करावा लागत आहे.

मुंबईहून निघालेले भाविक आपल्या गावी पोहोचण्यासाठी मुंबई- गोवा महामार्गावरून प्रवास करण्यास प्राधान्य देत असतात. मात्र, गणपतीच्या एक- दोन दिवस आधीच मोठ्या संख्येने लोक बाहेर पडल्याने त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. गुरुवार, ५ सप्टेंबर रोजीही मुंबई- गोवा महामार्गावर जबरदस्त वाहतूक कोंडी होती. यामुळे लोकांना इच्छित स्थळी पोहचण्यास भरपूर वेळ लागत होता. हेच चित्र शुक्रवार, ६ सप्टेंबर रोजी असून या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे, सुकेळी खिंड, लोणेरे परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. शिवाय महामार्गावरील खड्डे आणि सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक अगदीच संथ गतीने सुरू आहे. मुंबई- गोवा महामार्गावर झालेली कोंडी लक्षात घेऊन काही भाविकांनी पुणे मार्गे कोकणात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या मार्गावर आता मोठ्या संख्येने गाड्या आल्याने येथेही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती आहे.

हे ही वाचा :

तीन दिवसांत भाजपाशी जोडले १ कोटी लोक

कपिल परमारने ज्युदोमध्ये कांस्यपदक जिंकून रचला इतिहास,अशा कामगिरीने ठरला पहिला भारतीय !

लोअर परळच्या कमला मिल परिसरात पुन्हा आगीचे लोट !

‘लाडकी बहीण’ योजनेवरून खोटा आरोप करणाऱ्या आव्हाडांविरोधात गुन्हा

दुसरीकडे, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर ३१० जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलं आहे. कोकण रेल्वेमार्गावर गणपती स्पेशल गाड्या जवळपास साडेचार तास उशीराने धावत आहेत. तर नियमित धावणाऱ्या गाड्या दीड तास उशीराने धावत आहेत. यामुळे गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा होत असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version