करोनाच्या साथीमध्ये पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला होता. मात्र त्यानंतर पर्यटन क्षेत्रात पुन्हा वाढ झाली आहे. त्याचा लाभ हॉस्पिटॅलिटी अर्थात आतिथ्यशील क्षेत्रालाही होत आहे. या क्षेत्रात प्राथमिक स्तरावरील ऍप्रेन्टिस आणि प्रशिक्षणार्थींच्या संख्येत वाढ झाली असल्याचे या उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
गेल्या दोन वर्षांत ऍप्रेन्टिस आणि प्रशिक्षणार्थींच्या संख्येत ५४ टक्क्यांनी वाढ झाली असताना एकट्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील या दोघांच्या संख्येत तब्बल २७१ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे, असे ‘टीमलीज’ने स्पष्ट केले आहे.
‘पर्यटन क्षेत्रात वाढ झाल्यामुळे एकूणच नोकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. फूड आणि बेव्हरेज म्हणजेच अन्नपदार्थांशी संबंधित नोकऱ्यांमध्ये ३७ टक्के वाढ झाली असून स्वच्छतेशी संबंधित कामांमध्ये २२ टक्के वाढ झाली आहे. उच्च स्तरावरील कौशल्याधारित नोकऱ्यांमध्येही आठ ते १० टक्के वाढ नोंदली गेली आहे. तर, हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात १८ ते २० टक्के वाढ नोंदवली गेली आहे,’ असे टीमलीज डिग्री ऍप्रेन्टिसिशिप्सच्या उपाध्यक्ष धृती प्रसन्ना महंता यांनी सांगितले.
पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगात प्राथमिक स्तरावरील नोकऱ्यांमध्ये गेल्या दोन वर्षांत वाढ झाली आहे. भारतात गेल्या दोन वर्षांत ऍप्रेन्टिसच्या संख्येत ५.४पट वाढ झाली आहे. सन २०-२१मध्ये हे प्रमाण ०.४ टक्के होते तर, सन २०२२-२३मध्ये हे प्रमाण २.४ टक्के होते. हॉस्पिटॅलिटी क्षेत्र पुन्हा त्यांचे सुगीचे दिवस अनुभवत असल्याचे हॉटेल व्यावसायिक सांगत आहेत.
हिल्टन इंडियाचे उपाध्यक्ष (एचआर) साबू राघवन सांगतात, ‘२०२३ मध्ये पाहिल्या गेलेल्या संघटित हॉटेल क्षेत्रातील नोकऱ्यांत झालेली वाढ या क्षेत्राची लवचिकता, वाढीची क्षमता आणि धोरणात्मक विस्ताराचे द्योतक आहे. हा वेग २०२४मध्येही कायम राहील, अशी अपेक्षा आहे.’ हा वेग दीर्घकाळ टिकेल, अशी आशा व्यक्त होत आहे. ‘नवी हॉटेल उघडणे आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात नव्या नोकऱ्यांची निर्मिती होणे… हा ट्रेन्ड सन २०३०मध्येही कायम राहील. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे साऊथ इंडिया हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे मानद सचिव टी नटराजन यांनी सांगितले.
करोनासाथीनंतर प्रवाशांमध्ये झालेल्या वाढीमुळे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात नवी गुंतवणूकही वाढू लागली आहे. जुलै-सप्टेंबरमध्ये अनेक हॉटेलांची उद्घाटने झाली, असे जेएलएलच्या हॉटेल मोमेन्टम इंडिया अहवालात नमूद केले आहे. या काळात एकूण दोन हजार ४०० खोल्या असणाऱ्या ३४ हॉटेलांची उद्घाटने झाली. यातील ८० टक्के हॉटेले ही टायर-२, टायर-३ श्रेणींतील शहरांमध्ये झाली.
हे ही वाचा:
हिजबुलचा वॉन्टेड दहशतवादी जाविद अहमद मट्टू दिल्ली पोलिसांच्या ताब्यात!
चहाचा आस्वाद घेतल्यानंतर आता मोदींचे मीरा मांझींना पत्र!
प. बंगालमधून दीड लाख अमेरिकन डॉलर जप्त
अन्य धर्माबद्दल बोलले असते तर आव्हाड जिवंत तरी राहिले असते का?
नोकऱ्यांमध्ये झालेल्या वाढीमुळे पगारातही वाढ झाली आहे. ‘प्रशिक्षणार्थींच्या स्टायपेन्डमध्ये १५ टक्के वाढ झाली आहे. तर, कायम तत्त्वावरील आणि कुशल कर्मचाऱ्यांच्या पगारातही आठ ते १० टक्के वाढ झाली आहे. आधी पर्यटन क्षेत्रात एका ठराविक हंगामात कर्मचारी वर्गाला नोकऱ्या दिल्या जात असे. आता मात्र या क्षेत्रात वर्षभर नोकऱ्या असतात, असेही महांता यांनी सांगितले. हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाने हॉटेल उद्योगांचे भारतातील राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नातील योगदान सन २०४७पर्यंत एक ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल आणि कमाल २५ टक्के मनुष्यबळात वाढ होईल, असा अंदाज वर्तवला आहे.