जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सोमवारी (३ जून) सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.टिपण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक लष्कर-ए-तैयबा संघटनेचा प्रमुख कमांडर होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.सुरक्षा दलांकडून परिसरात अजूनही शोधमोहीम सुरु आहे.
कमांडर रियाझ शेत्री आणि त्याचा सहकारी रईस दार असे ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे असून दोघांचीही ओळख पटली आहे.ठार करण्यात आलेला दहशतवादी कमांडर रियाझ शेत्री हा २०१५ पासून दहशतवादी कारवाईमध्ये सक्रिय होता.हत्या, ग्रेनेड हल्ले आणि दहशतवादी भरती यासह २० हून अधिक दहशतवादी-संबंधित घटनांमध्ये त्याच्या भूमिकेसाठी त्याला A+ म्हणून वर्गीकृत करण्यात आले होते. त्याच्या डोक्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
शैक्षणिक नैराश्यातून मुंबईतील ‘आयएएस’ दाम्पत्याच्या मुलीने केली आत्महत्या
कोल्हापुरात भरधाव कारने सहा जणांना उडवले! तिघे मृत
सलामीच्याच सामन्यात वेस्ट इंडिजची दमछाक!
आंतरवाली सराटीतील गावकरीच जरांगेच्या विरोधात!
दरम्यान, सोमवारी सकाळी सुरक्षा दलांना पुलवामा येथील नेहामा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती.गुप्त माहितीच्या आधारे शोध मोहीम सुरु करण्यात आली आणि संपूर्ण परिसराला पोलीस आणि सुरक्षा दलांनी वेढा घातला.अधिकाऱ्याने सांगितले की, शोधमोहिमेदरम्यान अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला अन शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले.प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनीही गोळीबार केला, ज्यामुळे चकमक झाली आणि दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. दरम्यान, हे दोन्ही दहशतवादी ज्या घरात लपून बसले होते, त्या घराला आग लागली अन त्याचवेळी दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.