टोमॅटोचे दर घसरले; मुंबईत ६० ते ८० रुपये किलो

गगनाला भिडलेले दर कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा

टोमॅटोचे दर घसरले; मुंबईत ६० ते ८० रुपये किलो

टोमॅटोचे गगनाला भिडलेले दर कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. जूनपासून वाढत गेलेले टोमॅटोचे दर तब्बल १६० ते २०० किलोवर पोहोचले होते. आता मात्र ६० ते ८० रुपये किलोवर पोहोचल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

दक्षिण भारत आणि महाराष्ट्रातून टोमॅटोचे नवीन पीक बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच किरकोळ बाजारात टोमॅटो २५ ते ३० रुपये किलोने मिळू लागतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

भाज्यांच्या दरातही घसरण सुरू झाली आहे. जुलैमध्ये भाज्यांचे दर १०० ते १२० रुपये किलोवर पोहोचले होते. ते ऑगस्टमध्ये ८० ते १०० रुपये किलोवर पोहोचले आहेत. ‘कोथिंबिरीची जुडी ४० रुपयांवरून १० रुपयांना मिळू लागली आहे, तर २०० रुपये किलोपर्यंत पोहोचलेली हिरवी मिरची १०० रुपये किलोवर पोहोचली आहे,’ असे एका किरकोळ भाजीविक्रेत्याने सांगितले. ‘फ्लॉवर, वांगी, भेंडी आणि फरसबी या भाज्याही ८० ते १०० रुपये किलोने मिळू लागल्या आहेत. केवळ गवार आणि तोंडली १०० ते १२० रुपये किलोने मिळत आहेत,’ अशीही माहिती त्याने दिली.

वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये शुक्रवारी उत्तम दर्जाचा टोमॅटो ३५ रुपये तर त्याखालील दर्जाचा टोमॅटो २५ ते ३० रुपये किलोने विकला जात होता, अशी माहिती एपीएमसीचे संचालक शंकर पिंगळे यांनी दिली. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दर आणखी घसरतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. ‘टोमॅटोचे दर लवकरच २५ रुपये किलोवर पोहोचतील. मे-जूनमध्ये टोमॅटोचे दर वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी नफा कमवण्यासाठी टोमॅटोचे पीक लावले आहे. त्यांना आता नफा कमवायचा आहे. आता बाजारात दररोज टोमॅटो येऊ लागले आहेत. तसेच, मेनूमधून गायब झालेले आले, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरही पुन्हा ताटात येऊ लागली आहे,’ असे भायखळ्याच्या एका घाऊक विक्रेत्याने सांगितले.

हे ही वाचा:

विराट कोहलीची धावांसाठी ५१० किमींची ‘धाव’

दत्तक हिंदू मुलांवर धर्मांतरासाठी दबाव, १७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

हिमाचल मधील ११ हजार घरांचे नुकसान; राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी !

राहुल गांधी नव्या वास्तूच्या शोधात

टोमॅटो शुक्रवारी ५० ते ६० रुपये किलोने विकला जात होता. तर, बाजारात आलेले हिरवे मटारही ८० ते ९० रुपये किलोने विकले जात आहेत. नवीन आले १२० रुपये किलोने तर, जुने २०० रुपये किलोने विकले जात आहे. आधी त्यांचे दर ३०० ते ३५० रुपये किलो होते. मात्र कांदा, कोबी आणि सिमला मिरची अजूनही महागच आहेत. कांद्याच्या किमती २० ते २२ रुपये किलोवरून ३० ते ३२ रुपये किलोवर पोहोचल्या आहेत.

Exit mobile version