पेसमेकर बसविलेला असूनही एव्हरेस्ट शिखर सर करणारी आशियातील पहिली महिला होण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या ५९ वर्षीय भारतीय गिर्यारोहकाचे नेपाळमधील बेस कॅम्पवर गुरुवारी निधन झाले.सुझॅन लिओपोल्डिना जीसस असे या महिलेचे नाव आहे. एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर असताना हवामानाशी जुळवून घेण्यासाठी असलेल्या सरावादरम्यान अडचणी आल्याने त्यांना सोलुखुंबू जिल्ह्यातील लुक्ला शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यात त्यांचा गुरुवारी मृत्यू झाला, असे नेपाळच्या पर्यटन विभागाचे संचालक युवराज खतिवडा यांनी सांगितले.
सुझान यांना पेसमेकर लावण्यात आला होता. बेस कॅम्पवरील व्यायामादरम्यान सामान्य वेग राखण्यात अपयशी ठरल्याने आणि चढाई करण्यात अडचण आल्याने त्यांना माऊंट एव्हरेस्ट शिखरावर जाण्याचा प्रयत्न सोडून देण्यास सांगण्यात आले, अशी माहिती खतिवडा यांनी दिली. मात्र सुझानने हा सल्ला धुडकावून लावला. त्या आठ हजार ८४८. ८६ मीटर उंचीवरील चढाई करण्यावर ठाम होत्या. या उंच शिखरावर चढाईची परवानगी मिळवण्यासाठी त्यांनी आधीच शुल्क भरले होते. माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या थोडे वर, म्हणजे पाच हजार ८००मीटरपर्यंत त्यांनी चढाई केली. मात्र त्यानंतर बुधवारी संध्याकाळी सुझानला जबरदस्तीने लुक्ला शहरात नेण्यात आले आणि तिला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले.
‘आम्हाला तिला जबरदस्तीने लुक्ला येथे परत घेऊन जावे लागले. तिला बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टर भाड्याने घ्यावे लागले. आम्ही त्यांना पाच दिवसांपूर्वीच चढाईचा प्रयत्न सोडण्यास सांगितले होते. मात्र त्या एव्हरेस्टची चढाई करण्यावर ठाम होत्या,’ अशी माहिती मोहिमेचे संयोजक, ‘ग्लेशियर हिमालयन ट्रेक’चे अध्यक्ष डेंडी शेर्पा यांनी दिली. सुझान या एव्हरेस्टची चढाई करण्यासाठी योग्य नाही, हे तेथील हवामानाशी जुळवून घेण्याच्या प्राथमिक सरावादरम्यान आढळून आले होते.
शेर्पा यांनी पर्यटन विभागाला एक पत्र लिहून सुझान माउंट एव्हरेस्टवर चढाई करण्याच्या स्थितीत नाहीत, असेही कळवले होते. ‘सुझान यांना केवळ २५० मीटर लांबीच्या बेस कॅम्पच्या वर असलेल्या क्रॉम्प्टन पॉइंटवर पोहोचण्यासाठी पाच तासांपेक्षा जास्त वेळ लागला. गिर्यारोहक साधारणपणे हे अंतर १५ ते २० मिनिटांत पार करू शकतात.
हे ही वाचा:
वानखेडेंवरील प्रतिज्ञापत्रात फ्लॅट, महागडी घड्याळे, परदेश दौरे
इम्रानच्या घराबाहेर पोलिस छाप्याच्या तयारीत !
पाच कोटी रुपये भरा अन्यथा अटक : सेबीचा चोक्सीला इशारा !
ठाकरे, पवारांना निमंत्रण, केजरीवाल, केसीआरवर फुली
हवामानाशी जुळवून घेण्याच्या सरावादरम्यान पॉइंटपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना पहिल्या प्रयत्नात पाच तास, दुसऱ्या प्रयत्नात सहा तास आणि तिसऱ्या प्रयत्नात तब्बल १२ तास लागले. मात्र शिखरावर पोहोचणारी पेसमेकर बसवलेली पहिली आशियाई महिला बनून त्यांना नवीन विश्वविक्रम करायचा होता,’ असे शेर्पाने सांगितले.सुझान यांना घशाचा त्रास जाणवत होता. तसेच, अन्नही सहज गिळता येत नव्हते. सुझानचा मृतदेह गुरुवारी दुपारी काठमांडूला आणण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी महाराजगंज येथील त्रिभुवन विद्यापीठाच्या रुग्णालयात नेण्यात आला. त्यांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आले असून ते शुक्रवारी संध्याकाळपर्यंत काठमांडूला पोहोचतील, अशी अपेक्षा होती.
गुरुवारी सकाळी माऊंट एव्हरेस्टवर चढताना एका चिनी गिर्यारोहकाचाही मृत्यू झाला, त्यामुळे या हंगामात एव्हरेस्टवर मृतांची संख्या आठ झाली आहे. यामध्ये चार शेर्पा गिर्यारोहक, एक अमेरिकन डॉक्टर आणि मोल्दोव्हन यांचा समावेश आहे.