स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विज्ञाननिष्ठतेची देशाला गरज अधिक- जयंत नारळीकर

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विज्ञाननिष्ठतेची देशाला गरज अधिक- जयंत नारळीकर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विज्ञाननिष्ठतेची आज देशाला अधिक गरज असल्याचे प्रतिपादन जेष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सावरकरांची विज्ञाननिष्ठा उलगडून सांगितली.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १३८ वा जयंती दिन शुक्रवार, २८ मे रोजी देशभर मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फ़े शौर्य पुरस्कार आणि समाजसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी हुतात्मा कर्नल बी. संतोष बाबू यांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार प्रदान केला गेला तर समाजसेवेसाठी रा. स्व. संघ जनकल्याण समिती, पुणे यांना पुरस्कार दिला गेला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर उपस्थित होते.

हे ही वाचा:

ऑक्सिजन एक्सप्रेसने पोहोचवला २०,००० मॅट्रिक टनपेक्षा अधिक ऑक्सिजन

दहावी मूल्यांकन पद्धतीबाबत शाळा, पालक संभ्रमातच

बनावट ओळखपत्राच्या आधारे अभिनेत्रीचे लसीकरण

कोविडमुळे निराधार झालेल्या मुलांसाठी सरसावले मोदी सरकार

विकसित देशांमध्ये विज्ञानावर मोठा भर दिला जातो, भारतामध्ये मात्र कृतीपेक्षा चर्चाच अधिक असून विज्ञानाबाबत असणारी ही उदासीनता देशाला आणि समाजालाही घातक आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी विज्ञानाच्या महत्त्वाबाबत नेहमीच भर दिला, असे स्पष्ट करीत विख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी देशाला सावरकर यांच्या विज्ञाननिष्ठतेची अधिक गरज असल्याचे प्रतिपादन केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची गरज किती महत्त्वाची आहे, ते लक्षात घेऊन विज्ञानवादाला साकार केले होते. ते धर्माभिमानी होते मात्र धर्मांध नव्हते. विज्ञानाच्या चष्म्यातून पाहात त्यांनी धार्मिक रुढी-रिवाजांवर भाष्य केले, टीका केली. आजही त्यांच्या विज्ञाननिष्ठेची समाजाला गरज आहे, असेही यावेळी जयंत नारळीकर यांनी सांगितले.

या जयंतीदिनी स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार हा गलवान घाटीत चिनी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देताना हुतात्मा झालेले १६ बिहार रेजीमेंटचे कर्नल बी. संतोष बाबू यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला होता. तो पुरस्कार वीरपत्नी संतोषी संतोष बाबू यांनी स्वीकारला. एक लाख एक हजार एक रुपयांचा हा पुरस्कार आहे. तसेच यात स्मृतिचिन्ह, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा आणि मानपत्र याचाही समावेश आहे.

तर स्वातंत्र्यवीर सावरकर समाजसेवा पुरस्कार हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती, पुणे यांना देण्यात आला. हा ५१ हजार रुपयांचा पुरस्कार, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार आहे. या पुरस्काराबाबत जनकल्याण समितीचे कार्यवाह अश्विनीकुमार उपाध्ये यांनी स्मारकाचे आभार मानले. कोरोना संसर्ग काळातील अतिशय महत्त्वाच्या आणि मोलाच्या कामगिरीसाठी हा पुरस्कार जनकल्याण समिती, पुणे यांना देण्यात आला आहे.

Exit mobile version