भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांच्या मागे लागणार मधमाशा!

तस्करांवर हल्ला करून कुंपण तोडण्यापासून रोखण्यात बजावणार महत्त्वाची भूमिका

भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांच्या मागे लागणार मधमाशा!

बांगलादेशातून भारतात येण्याचा प्रयत्न करणारे संभाव्य घुसखोर आणि तस्करांना लवकरच दणका मिळू शकतो किंवा त्यांचा चेहरा सुजण्याचीही दाट शक्यता आहे. कारण सीमा सुरक्षा दलातर्फे भारत-बांगलादेश सीमेलगतच पायलट प्रोजेक्ट म्हणून मधमाशी पालन आणि औषधी वनस्पती लागवडीची एकत्रित योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत कुंपणासोबतच मधमाशांच्या पेट्या जमिनीपासून किंचित वर ठेवल्या जाणार आहेत. खोक्यांभोवती काही फुलांची रोपे लावली जातील आणि खोक्यांवर सावली देऊन नैसर्गिक अधिवास निर्माण केला जाईल. ‘घुसखोरांना आणि तस्करांना हे कुंपण तोडण्यापासून रोखण्यासाठी या मधमाशा ‘मधमाशा सैनिक’ म्हणून काम करतील, अशी अपेक्षा आहे. अशा घुसखोरांवर आणि तस्करांवर हल्ला करून कुंपण तोडण्यापासून रोखण्यात त्या महत्त्वाची भूमिका बजावतील,’ असे सीमा सुरक्षा दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

 

मधमाशा पालनासह काळी तुळशी, सातमुळी, अश्वगंधा, कोरफड इत्यादी औषधी वनस्पतींच्या लागवडीसारख्या नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करून या योजनेचा लाभ सीमावर्ती गावांतील रहिवाशांना दिला जाणार आहे. या वनस्पतींची व्यावसायिक किंमत सामान्यतः लागवडीपेक्षा जास्त आहे. त्यांना बियाणे, माती परीक्षण, तांत्रिक सहाय्य आणि माहिती यांसारखी मदत दिली जाईल. विविध सरकारी योजनांतर्गत सातत्याने रोपे पुरविली जातील आणि ग्रामस्थांना त्यांची उत्पादने चांगल्या किमतीत खरेदीदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली जाईल. गावकऱ्यांना मधमाशी पालनाचे फायदे आणि त्याच्या व्यावसायिक फायद्यांबद्दलही माहिती देण्यात आली असून त्यांना त्यांची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

जबलपूरमध्ये सैन्य दलाच्या गाडीला अपघात; महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

अमेरिकेच्या अर्थसहाय्याने अदानी समूह श्रीलंकेत उभारणार बंदर, चीनची कोंडी

बरखास्त श्रीलंका क्रिकेट बोर्ड न्यायालयाकडून पुनर्स्थापित

भारत जगातील तिसरी महाशक्ती होईल

हा अभिनव उपक्रम चीनच्या सीमेलगत असलेल्या गावांमध्ये केंद्र सरकारने हाती घेतलेल्या ‘व्हायब्रंट व्हिलेजेस प्रोग्राम’मधून घेतला आहे. चीनच्या सीमेवरील गावांचा सर्वांगीण विकास आणि त्यांच्याशी सातत्याने संपर्क व्हावा, जेणेकरून येथील ग्रामस्थांमध्ये ते भारताचे नागरिक असल्याची भावना निर्माण होईल आणि गुप्तचर नेटवर्क मजबूत करण्यात मदत होईल, हा उद्देश यामागे आहे.

 

‘भारत-बांगलादेश सीमा बांगलादेशी घुसखोर आणि तस्करांपासून पूर्णपणे सुरक्षित करून सीमेवरील कुंपण अधिक प्रभावी बनवण्याच्या दिशेने बीएसएफ काम करत आहे आणि त्यांच्यासाठी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करून सीमावर्ती गावांतील लोकांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करत आहे,’ असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘सीमेच्या दोन्ही बाजूंना घनदाट जंगले आणि सधन शेती असल्यामुळे मधमाशांना पुरेसे अन्न मिळत राहील. तसेच, मोहरी आणि फुलांच्या लागवडीमुळे मधमाशांना पुरेसे अन्नही मिळेल,’ असे बीएसएफतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version