बँकखात्यावरील प्राप्तीकर विभागाच्या कारवाईला स्थगिती देण्याचे काँग्रेसने केलेले अपील प्राप्तीकर अपीलीय लवादाने शुक्रवारी फेटाळले. त्यानंतर या आदेशाला १० दिवसांची स्थगिती द्यावी, जेणेकरून ते उच्च न्यायालयात धाव घेऊ शकतील, अशी काँग्रेसने विनंती केली होती. मात्र तीही खंडपीठाने फेटाळून लावली.
काँग्रेसच्या मागील वर्षाच्या करपरताव्यामध्ये विसंगती आढळल्यामुळे प्राप्तिकर खात्याने लादलेल्या २१० कोटींच्या दंडाविरोधात पक्षाने केलेला अर्ज प्राप्तिकर अपीलीय लवादाने शुक्रवारी फेटाळला. तसेच, सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी १०३ कोटींचा करपरताव्याचा दावा केला होता. त्यानंतर तो १०५ कोटी करण्यात आला. त्यात ३० कोटींच्या रक्कम टाकून तो १३५ कोटींवर करण्यात आला.
हे ही वाचा:
दिव्यांग महिलांसाठी अत्याधुनिक शिलाई मशिन्स
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा व्हिडिओ समोर
मालदीवचे माजी राष्ट्रपती नशीद यांनी भारताची मागितली माफी
रोहित पवारांना ईडीचा झटका, बारामती अॅग्रो संबंधित कारखान्याची मालमत्ता जप्त!
काँग्रेसने अपीलीय लवादाकडे दावा केला की, प्राप्तीकरविभागाने त्यांच्या वेगवेगळ्या खात्यांतून अलोकशाही पद्धतीने ६५ कोटी रुपये काढले आहेत. १६ फेब्रुवारी रोजी काँग्रेसचे मुख्य बँकखाते गोठवण्यात आले होते. त्यानंतर याबाबतच्या सुनावण्या बाकी असल्याने प्राप्तीकर अपीलीय लवादाने त्यांना हे बँकखाते वापरण्यास परवानगी दिली होती.
‘आम्ही १०० वर्षे जुना राजकीय पक्ष असून आम्ही नियमितपणे करपरतावा भरतो. मात्र आता देशात निवडणुका होत असताना या लोकशाहीच्या उत्सवात आम्ही सहभागी होऊ नये, यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. आमची कोंडी केली जात आहे,’ अशा शब्दांत काँग्रेसच्या वकिलाने लवादापुढे काँग्रेसची बाजू मांडली. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला लक्ष्य केले जात असल्याचा खोटा दावा पक्षातर्फे केला जात असल्याचा दावा प्राप्तीकर विभागाने केला.