आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. प. बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस राज्यातील सर्वच्या सर्व ४२ जागा लढवणार आहे. मागील २४ तासांत काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जागावाटपासंदर्भात पुन्हा चर्चा सुरू झाल्याचे वृत्त आले होते. त्यामुळे काँग्रेसला दिलासा मिळत असल्याचे दिसू लागले होते. तसेच, ममता या काँग्रेसला पाच जागा देऊ शकतात, अशीही चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर ममता काँग्रेसला केवळ दोनच जागा देईल, अशाही वावड्या उडाल्या. मात्र शुक्रवारी रात्री तृणमूल काँग्रेसतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ‘काही आठवड्यांपूर्वीच तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल राज्यातील लोकसभेच्या सर्व ४२ जागा लढवेल, असे स्पष्ट केले होते. तसेच, आसाम आणि मेघालयातील तुरा जागेवरही उमेदवार उभे केले जातील. या परिस्थितीत आता कोणताही बदल होणार नाही,’ असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :
आसामचे समान नागरी कायद्याच्या दिशेने पाऊल
पंजाबच्या शेतांत काम करणारे शेतकरी आंदोलनात सहभागी का नाहीत?
संजय राऊत म्हणजे पाच लिटर रॉकेल, दोन काड्याच्या पेट्या घेऊन नारळाच्या झाडाखाली बसलेला माणूस
उत्तर प्रदेशात ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पडून भीषण अपघात; १५ भाविक ठार
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची खरी लढाई भाजपशी आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला २२ जागा मिळाल्या होत्या, तर भाजपने १८ जागांवर विजय मिळवला होता. मात्र मत टक्क्यांत फारसा फरक नव्हता. तृणमूल काँग्रेसला ४२ टक्के तर भाजपला ४० टक्के मते मिळाली होती. तर, काँग्रेसला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. डावे पक्ष खातेही उघडू शकले नव्हते.