राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत पुणे येथे पार पडलेल्या भाजपाच्या प्रदेश कार्यकारीणीत भाजपा नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जळजळीत टीका केली. ‘दुसऱ्याचे बळ घेऊन फक्त सर्कशीतला वाघ बनता येते, जंगलाचा राजा नाही’, या शब्दात त्यांनी ठाकरेंचीही खिल्ली उडवताना, सचिन वाजे आणि वज्रमुठीवरून त्यांनी जबरदस्त भडीमार केला.
भाजपा अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा सध्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या उपस्थितीत पुण्यात भाजपाची राष्ट्रीय कार्यकारीणी पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यावेळी अत्यंत आक्रमक भाषण झाले.
‘उद्धवजी, जे काही बनायचे आहे, ते स्वत: च्या भरवशावर बना. दुसऱ्याचे बळ घेऊन सर्कशीतला वाघ बनता येते, जंगलाचा राजा नाही’, अशा कठोर शब्दात त्यांनी ठाकरेंचे वाभाडे काढले.
वाजे वर्षा किंवा मातोश्रीवरच असायचा
सध्या तुरुंगात असलेल्या सचिन वाजे याच्यावरून फडणवीसांनी ठाकरेंना लक्ष्य केले. ‘मुख्यमंत्री असताना सचिन वाजेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी उद्धव ठाकरे प्रचंड आग्रही होते. परंतु मी त्यांना जुमानले नाही. स्वत: मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी पहीले काम केले, ते म्हणजे वाजेला सेवेत घेतले. पुन्हा सेवेत आल्यावर हा वाजे एक तर वर्षा बंगल्यावर असायचा किंवा मातोश्रीवर. विरोधी पक्षनेता म्हणून मनसुख हिरणची हत्या मी बाहेर काढली नसती तर, मविआने हे प्रकरण दडपून टाकले असते आणि त्यांची वसूली सुरूच राहीली असती’, अशी तोफ फडणवीस यांनी डागली.
पवारांचा दाखला देत ठाकरेंवर तीर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरीत्रातील ठाकरे यांच्या कार्यशैलीवर कडवट टीका करणारी वाक्य उपस्थितांना त्यांनी वाचून दाखवली. हीच टीका जेव्हा आम्ही करत होता, तेव्हा आम्हाला महाराष्ट्रद्रोही म्हटले जायचे, असा टोला त्यांनी लगावला.
महाराष्ट्रात सध्या भाकरी फिरवणारे, भाकरीचा तुकडा तोडणारे आणि अख्खी भाकरी पळवणारे असे तीन पक्ष आहेत, अशी टीचकी त्यांनी महाविकास आघाडीला लगावली.
कार्यकर्त्यांना आवाहन
आगामी निवडणुका लक्षात घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले. २०२३ चे अखेरचे सहा महीने आणि २०२४ चे पहीले सहा महीने सर्वांनी झोकून देऊन काम केले पाहीजे. संघटनेत संपर्क, सरकार आणि जनतेत संवाद सेतू बनून सरकारची काम लोकांपर्यंत पोहोचवायला हवीत. ‘आपला फॉर्म्युला मोदीजींची कार्यशैली, आपले नेरेटीव्ह सामान्यांचा विकास’ असे सूत्र त्यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडले.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, ठाकरे गटाने न्यायालयाला आठ विनंत्या केल्या होत्या, पैकी एकही मागणी मान्य झाली नाही. असे ते म्हणाले.