महाराष्ट्रातील ताडोबा अभयारण्यातील एक नर वाघ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. याला कारण म्हणजे, या वाघाने केलेला प्रवास. वाघ हे त्यांच्या अधिवासातून दुसऱ्या अधिवासात प्रवास करत असतात. त्याच्या अनेक कहाण्या लोकांना माहितही असतात. पण ताडोबामधील या नर वाघाने तब्बल २ हजार किलोमीटर अंतराचा प्रवास पूर्ण केला आहे.
ताडोबा अभयारण्यातील हा नर वाघ सुरक्षित ठिकाण शोधण्याच्या प्रयत्नात आणि आपल्या जोडीदाराच्या शोधात थेट २ हजार किलोमीटरचा प्रवास करत ओडिशामध्ये पोहचल्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून ओडिशाच्या दिशेने जाता या वाघाने चार राज्ये ओलांडली आहेत. विशेष म्हणजे वाघाच्या अंगावरील पट्ट्यांमुळे त्याची ओळख पटली आहे.
साधारणपणे एखाद्या वाघाला रेडिओ कॉलर घातली असेल, तर त्याचं लोकेशन ट्रेस केलं जात. त्यावरूनचं वन विभागाचे कर्मचारी एखाद्या वाघाने किती प्रवास केला हे ओळखू शकतात. मात्र, या वाघाच्या बाबतीत असं झालेलं नाही. त्यांच्या अंगावरील पट्ट्यांच्या पॅटर्नमुळे तो ओळखून आला. तो ताडोबातून ओडिशामध्ये पोहोचल्याचं स्पष्ट झालं.
हे ही वाचा:
ऑक्सिजन प्रकल्प कंत्राटात गैरव्यवहार प्रकरणी रोमीन छेडाला अटक
स्वतःला सोनिया हृदयसम्राट, राहुल हृदयसम्राट, शरद हृदयसम्राट अशा पदव्या लावा!
‘डीपफेक’बाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी सात दिवसांत धोरणांमध्ये आवश्यक बदल करावेत
अंतरवली सराटीमधील दगडफेकीच्या घटनेतील मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या
ओडिशाच्या जंगलामध्ये अचानक एक रॉयल बंगाल टायगर दिसल्याची माहिती एका वन कर्मचाऱ्याने दिली होती. यानंतर या वाघाचे पट्टे पाहून त्याची ओळख पटवण्यात आली. त्यातून हा वाघ ताडोबामधील असल्याचं स्पष्ट झालं. देशातील हा एखाद्या वाघाचा दुसरा सर्वात लांब प्रवास असू शकतो. या वाघाने वाटेमध्ये कित्येक नद्या, डोंगर, शेत, रस्ते आणि गावं ओलांडली आहेत. या संपूर्ण प्रवासात एकदाही त्याने एखाद्या माणसावर हल्ला केल्याची घटना घडली नाही, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे.