पर्यावरणप्रेमींमध्ये जागतिक तापमानवाढीबाबत चिंता
नेपाळमध्ये ३,१६५मी उंचीवर ‘रॉयल बंगाली वाघा’चे दर्शन झाल्यामुळे पर्यावरण प्रेमींकडून जागतिक तापमानवाढीच्या परिणामांबाब चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
यापूर्वी २०१८ मध्ये भूतानमध्ये देखील ४,०३८ मीटर उंचीवर वाघ पाहण्यात आला होता. त्याशिवाय भारताच्या अरुणाचल प्रदेश मधील दिबांग खोऱ्यात ३,६३० मीटर उंचीवरसुध्दा वाघ पाहिला गेला होता.
वाघाचे या उंचीवर दिसणे हे अनपेक्षित असून ते पर्यावरणाच्या दृष्टीने सुचिन्ह नाही. विलुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या या प्राण्याचा नैसर्गिक अधिवास धोक्यात असल्याचे चिन्ह आहे. त्याचबरोबर हे जागतिक तापमानवाढीचे द्योतक देखील आहे.
जागतिक व्याघ्र सांख्यिकीनुसार २०१६ मध्ये २,२२६ भारतात, ४३३ रशियात, ३७१ इंडोनेशियात, २५० मलेशियात, १९८ नेपाळमध्ये, १८९ थायलंडमध्ये, १०६ बांग्लादेशमध्ये, १०३ भूतानमध्ये तर चीन, व्हिएतनाम आणि लाओसमध्ये अनुक्रमे सात, पाच आणि दोन वाघ पाहण्यात आले आहेत.
नेपाळमध्ये वाघ आढळल्यामुळे पूर्व नेपाळमध्ये कांचनजंगा क्षेत्राचे असलेले महत्त्व अधोरेखित झाले आहे. उत्तर सिक्कीम मधील ‘सिंगालिआ राष्ट्रीय उद्यान’ आणि उत्तर बंगाल मधील ‘दूआर्स राष्ट्रीय उद्यानाला’ जोडणाऱ्या या भागाचे महत्त्व स्पष्ट झाले आहे.