टीसींना चकवण्यासाठी फुकट्या रेल्वेप्रवाशांना मदत करण्यासाठी एका वेबसाइटने पुढाकार घेतला आहे. या वेबसाइटवर सर्व रेल्वे स्थानकांची नावे आणि त्यांचे क्यू आर कोडची यादीच जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेमधूनच जीओफेन्सिंग सिस्टीमला चकवा देऊन रेल्वेमधूनही तिकीट काढणे शक्य होत आहे.
रेल्वेचे यूटीएस ऑन मोबाइल हे ऍप जीपीएसवर आधारित आहे. ज्यामध्ये ऍपच्या मदतीने रेल्वे स्थानकाच्या जीओ फेन्सिंग क्षेत्रात म्हणजेच पाच किलोमीटर परिघात आणि स्थानकाच्या २० मीटरबाहेर तिकीट-पास घेता येतो. यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकात तिकीट घेण्यासाठी स्वतंत्र क्यूआर कोड तयार करण्यात आला आहे. फोनच्या जीपीएस यंत्रणेच्या साहाय्याने ही यूटीएस यंत्रणा काम करते.
प्रवाशाने तिकीट काढण्याच्या परिसरात म्हणजेच स्थानक आणि रेल्वेमध्ये तिकीट काढू नये, यासाठी अशी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. मात्र एका व्यक्तीने तयार केलेल्या वेबसाइटवर अशा सर्व उपनगरीय स्थानकांची नावे आणि त्यांच्या क्यू आर कोडची यादीच पीडीएफ फाइलमध्ये दिली आहे. त्यामुळे ते जीओ फेन्सिंग यंत्रणेला चकवा देऊ शकत आहेत. त्यामुळे फुकट्या रेल्वेप्रवाशाला डब्यात किंवा कुठेही टीसी दिसल्यास तो या क्यू आर कोडच्या मदतीने तिकीट काढू शकतो. प्रवाशाने तो जिथून चढला आहे, तिथूनच तिकीट काढावे, यासाठी यूटीएस ऍप हे गॅलरीमधून क्यू आर कोड स्कॅन करण्यास परवानगी देत नाही. मात्र रेल्वे प्रवाशांनी यातूनही मार्ग काढला आहे. ते लिंक उघडल्यानंतर सहप्रवाशाला त्या स्थानकाच्या क्यू आर कोडचे छायाचित्र काढायला सांगतात. नंतर ते सहकाऱ्याच्या स्क्रीनवरून क्यू आर कोड स्कॅन करतात आणि तिकीट बूक करतात.
हे ही वाचा:
नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे २१ डबे घसरले; पाच ठार, ८० जखमी
खलिस्तानी समर्थक दहशतवाद्यांना घरी ठेवणाऱ्याला कॅनडाचा आश्रय
भारतीयांच्या सुटकेसाठी‘ऑपरेशन अजय’
भारतातील इस्रायली नागरीक चिंतेत!
‘आमच्या एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या नातेवाइकाने लोकलमध्ये प्रवास करताना हा प्रकार पाहिला. तसेच, हा प्रकार एसी रेल्वेमध्ये अधिक प्रमाणात घडत असल्याचेही आढळून आले आहे. या रेल्वेमध्ये एकामागोमाग एक असे सलग सहा डब्यांमधील दृश्य दिसू शकते. त्यामुळे टीसी आल्यास प्रवाशांकडून झटपट तिकीट काढले जाते. एका टीसीला एका डब्यातील प्रवाशांची तिकिटे काढायला किमान पाच मिनिटे लागतात. कोणत्याही प्रवाशाला या क्यू आर कोडच्या माध्यमातून तिकिटे काढायला हा वेळ पुरेसा आहे,’ असे या रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. काही जण तर या क्यू आर कोडच्या झेरॉक्स घेऊन प्रवास kरतात, असेही आढळले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी हे प्रकरण रेल्वे मंत्रालयाच्या निदर्शनास आणले आहे. त्यामुळे ते लवकरच हा गैरप्रकार थांबवण्यासाठी काहीतरी ठोस पावले उचलतील, अशी आशा आहे.