फाल्कन्सनी पटकावले मुंबई प्रीमियर लीग टेबलटेनिसचे विजेतेपद

थंडर फाल्कन्स संघाला विजेतेपदासाठीची ट्रॉफी आणि बक्षिसापोटी दीड लाख रुपयांचे इनाम

फाल्कन्सनी पटकावले मुंबई प्रीमियर लीग टेबलटेनिसचे विजेतेपद

थंडर्स फाल्कन्सनी सांघिक कामगिरीमध्ये कमालीचे सातत्य राखताना सेंच्युरी बॅशर्सवर १४०-५० गुणांनी दणदणीत विजय मिळवताना डीसीबी बँक-मुंबई प्रीमियर लीग (एमपीएल) टेबलटेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

 

सबर्बन टेबल टेनिस असोसिएशन (टीएसटीटीए, मुंबई) आणि मुंबई शहर जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या (एमसीडीटीटीए) संयुक्त विद्यमाने आयोजित विलेपार्ले पूर्व येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलामध्ये रंगलेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्या सामन्यात (१७ वर्षांखालील मुली गट) सना डिसोझाने वैष्णवी जैस्वालचा २-१ (११-५, ११-८, ९-११) असा पराभव करताना फाल्कन्सला विजयी सुरुवात करून दिली. त्यानंतर १७ वर्षांखालील मुले गटात विनीत दीपकने चैतन्य आहुजाचा ३-० (११-२, ११-८, ११-७) असा धुव्वा उडवताना संघाची आघाडी ५०-१० अशी वाढवली.

 

केदार कसबेकर (सीनियर पुरुष) आणि युवराज यादव (१५ वर्षांखालील मुले) या बॅशर्सच्या जोडीने सुहास राणे आणि विभूम साधळे या फाल्कन्सच्या जोडीवर २-१ (७-११, ११-०, १२-१०) अशी मात करताना प्रतिस्पर्ध्यांची आघाडी ३०-६० अशी कमी केली.

 

मात्र, फाल्कन्सचा फॉर्मात असलेला स्टार खेळाडू रिगन अल्बुकर्कने पुरुष एकेरीत चिन्मय सोमय्यावर ३-० (११-७, ११-६, ११-४) असा सहजविजय संघाला ९०-३० अशा मोठ्या आघाडीवर नेले. महिला एकेरीत मनुश्री पाटीलने विजय मिळवला तरी  सेनहोरा डिसोझाने तिला २-१ (११-५, ११-८, ५-११) असे झुंजवले. पाचव्या सामन्यानंतर फाल्कन्सकडे ११०-४० अशी निर्णायक आघाडी होती. परंतु, मिश्र दुहेरीत रिगन आणि सना जोडीने बॅशर्सच्या चिन्मय आणि वैष्णवी जोडीचे आव्हान २-१ (११-९, ७-११, ११-३) असे मोडीत काढताना संघाला (१३०-५०) विजयाच्या उंबरठ्यावर नेउन ठेवले.

हे ही वाचा:

संभाजीनगरचे नागरीक तहानलेले; पण आयुक्तांच्या वाढदिवसावर पाण्यासारखा पैसा खर्च

हैदराबादमध्ये आरटीआय कार्यकर्त्याचे अपहरण, मग खाणीत फेकले, बीआरएस कार्यकर्त्याचा पती आरोपी

‘तारक मेहता…’ मालिकेच्या निर्मात्यांविरुद्ध गुन्हा दाखल

मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराना आर्थिक रसद?

 

१५ वर्षांखालील मुले गटात विभूम साधलेने पहिला गेम जिंकताना १० गुण मिळवून विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
प्रमुख पाहुणे आणि ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांच्या हस्ते विजेत्या थंडर फाल्कन्स संघाला विजेतेपदासाठीची ट्रॉफी आणि बक्षिसापोटीचा दीड लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. उपविजेत्या सेंच्युरी बॅशर्सना उपविजेतेपदाची ट्रॉफी आणि ७५ हजार रुपयांचा धनादेश मिळाला. उपांत्य फेरीतील पराभूत संघ पिंग पँथर्स आणि सुपर टायटन्स यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले.

Exit mobile version