रविवारी श्रीलंकेने झिम्बाब्वेवर नऊ विकेटनी मात करत विश्वचषक पात्रता स्पर्धेत विजयाची घौडदौड कायम ठेवत भारतात होणाऱ्या विश्वचषक २०२३ सामन्यासाठी पात्र होणारा पहिला संघ ठरण्याची कामगिरी केली. विश्वचषक स्पर्धेत एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. यातील आठ संघ थेट पात्र ठरले आहेत. तर, उर्वरित दोन संघांचा निर्णय या पात्रता स्पर्धेतून होईल. श्रीलंका पात्र ठरल्यानंतर आता एका संघाचीच जागा शिल्लक आहे. सद्य परिस्थितीत यासाठी तीन संघ दावेदार आहेत.
झिम्बाब्वे
सन २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत पात्र होण्यासाठी झिम्बाब्वेचा संघ सर्वांत आघाडीवर आहे. झिम्बाब्वेने पात्रता स्पर्धेत त्यांचा सर्वोत्कृष्ट खेळ दाखवला आहे. श्रीलंकेकडून पराभूत होईपर्यंत त्याला कोणताही संघ हरवू शकला नव्हता. रविवारच्या सामन्यात ते श्रीलंकेला पराभूत करू शकले असते तर त्यांना विश्वचषक स्पर्धेचे तिकीट मिळू शकले असते. मात्र पराभूत करूनही त्यांच्या विश्वचषक स्पर्धेच्या आशा कायम आहेत. त्यांच्याकडे सुपर ६ मधील चार सामन्यांमधून सहा गुण आहेत. तर, त्यांचा शेवटचा सामना स्कॉटलंडच्या विरोधात आहेत. हा सामना त्यांनी जिंकला तर ते सहजच विश्वचषक स्पर्धेत खेळू शकतील.
स्कॉटलंड
वेस्ट इंडिजला पराभूत करून त्यांना विश्वचषक स्पर्धेतूनच बाहेर फेकणाऱ्या स्कॉटलंड संघाचे भवितव्यही त्यांच्याच हातात आहे. त्यांच्या खात्यातही चार गुण असून ते गुणतक्त्यात तिसऱ्या क्रमांकावर आहेत. स्कॉटलंडला या स्पर्धेतील आणखी दोन सामने खेळायचे आहेत. हे दोन्ही सामने त्यांनी जिंकल्यास तर ते विश्वचषक स्पर्धेत खेळू शकतील. स्कॉटलंडच पुढचे दोन सामने झिम्बाब्वे आणि नेदरलँड्सविरुद्ध आहेत.
हे ही वाचा:
‘गोलमाल’मधील अभिनेते हरिश मैगन यांचे निधन
राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून सत्तेत सहभागी; पुढील निवडणुका पक्ष, चिन्हासोबतच लढवणार
नेदरलँड्स
नेदरलँड्सच्या खात्यात सध्या केवळ दोनच गुण आहेत. मात्र त्यांचेही ओमान आणि नेदरलँड्सविरुद्धचे सामने शिल्लक आहेत. नेदरलँड्सला हे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. मात्र एवढे करून भागणार नाही. झिम्बाब्वेचा संघ पराभूत व्हावा, यासाठी त्यांना प्रार्थना करावी लागेल. जर स्कॉटलंडने झिम्बाब्वेला पराभूत केले आणि नेदरलँड्सने स्कॉटलंडवर मात केली, तर कोणत्याच संघाला सहा गुण मिळू शकणार नाहीत. अशा परिस्थितीत रनरेटच्या आधारावर अंतिम संघ निवडला जाईल.