भारत आणि इंग्लंड यांच्यातले तीन एक दिवसीय सामने महाराष्ट्रात होणार आहेत. महाराष्ट्रातील कोविडची परिस्थिती बघता या तिन्ही सामन्यांवर अनिश्चिततेचे सावट होते. पण अखेर हे सामने महाराष्ट्रातच होणार असल्याचे निश्चित झाले आहे. पण या तीनही सामन्यांना प्रेक्षकांना मात्र ‘नो एन्ट्री’ असणार आहे
भारत आणि इंग्लंड यांच्यात होऊ घातलेल्या एक दिवसीय मालिकेतील तीन सामने पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर होणार आहेत. अनुक्रमे २३, २६ आणि २९ मार्च रोजी होणाऱ्या या सामन्यांच्या बाबतीत अनिश्चितता होती. महाराष्ट्रातील कोविड परिस्थिती दिवसेंदिवक बिकट होत असल्याने ही अनिश्चितता होती. याच संदर्भात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विकास काकतकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर हे तीनही सामने महाराष्ट्रातच खेळवले जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. महाराष्ट्र सरकारकडून त्यासंबंधीची परवानगी दिली जाणार आहे.
सामने होणार, पण प्रेक्षकांविना
भारत-इंग्लंड दरम्यानचे तीन सामने महाराष्ट्रात होणार असले तरीही हे तीनही सामने बिना प्रेक्षकांचे खेळवले जाणार आहेत. महाराष्ट्रातील कोवीडचा वाढत धोका लक्षत घेऊनच सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोविडचे सर्व निर्बंध काटेकोरपणे पाळण्याच्या अटीवरच हे सामने महाराष्ट्रात खेळवायला अनुमती दिली गेली आहे.