कुस्ती महासंघाचे निलंबन केल्यानंतर आता त्याजागी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची घोषणा क्रीडा मंत्रालयाने केली आहे. क्रीडा मंत्रालयाने भारतीय ऑलिंपीक संघटनेच्या माध्यमातून ही समिती तयार केली आहे.
संजय सिंग यांच्या अध्यक्षतेखाली नवी कुस्ती संघटना अस्तित्वात आल्यावर त्यांनी केलेल्या एका स्पर्धेच्या अयोजनावरून क्रीडा मंत्रालयाने संघटना निलंबित केली आहे. त्यामुळे संघटनेचा कार्यभार पाहण्यासाठी या समितीची स्थापना केली गेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून लैंगिक शोषणावरून कुस्तीगिर आणि कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्यात वाद सुरू आहे. त्यातून या सगळ्या घडामोडी घडल्या आहेत.
भुपेंद्र बाजवा यांच्या अध्यक्षतेखाली ही हंगामी समिती तयार केली असून त्यात एमएम सोमय्या, मंजुषा कंवर हे आणखी दोन सदस्य आहेत. या समितीचे कार्य असेल ते म्हणजे कुस्ती स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड करणे, आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडूंच्या प्रवेशिका पाठवणे, स्पर्धांचे आयोजन करणे, संघटनेची बँक खाती आणि वेबसाईटचे व्यवस्थापन करणे.
हे ही वाचा:
बाजारात तुरी… पण संपत नाही हाणामारी
पुण्यातील विमाननगर भागात १० सिलिंडर फुटले!
काशीच्या संतांकडून २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टीची मागणी!
युपीत नायब तहसीलदार मशिदीत पढत होता नमाज
यावर्षीच्या मे महिन्यात माजी अध्यक्ष बृजभूषण यांना संघटनेच्या कामापासून दूर राहण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर त्रिसदस्यीय समिती संघटनेचे काम पाहात होती. २१ डिसेंबरला संघटनेच्या निवडणुकीचे निकाल लागून संजय सिंग हे नवे अध्यक्ष निवडले गेले. मात्र स्पर्धा आयोजनात नियमांचे पालन न केल्यामुळे संघटना निलंबित करण्यात आली. त्यानंतर पुन्हा नव्याने त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
याआधी, संजय सिंग यांची निवड झाल्यानंतर साक्षी मलिकने कुस्ती सोडण्याचा निर्णय जाहीर केला तर बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत केला तसेच विनेश फोगाटने खेलरत्न, अर्जुन पुरस्कार परत केले.