मुंबईतील माटुंगा येथे शनिवारी २९ जानेवारी रोजी झालेल्या विचित्र अपघातात मुंबई अग्निशमन दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. हा अपघात मॉक ड्रिल दरम्यान झाला असून हे जवान अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांमध्ये चेंगरून जखमी झाले. तिघांपैकी एका जवानाची प्रकृती चिंताजनक आहे. निवृत्ती सखाराम इंगवले, चंचल भिमराव पगारे आणि सदाशिव धोंडीबा कर्वे अशी जखमी झालेल्या जवानांची आहेत. या तिघांपैकी एका जवानाचा उजवा पाय कापून काढावा लागला.
शनिवारी माटुंग्यातील भाऊ दाजी रोडवरील श्रीनिधी अपार्टमेन्टमध्ये मॉक ड्रिल सुरु होते. आग विझवण्याचे कार्य चालू असतेवेळी पाण्याचा पंप चालवताना एका मर्यादेपेक्षा जास्त इंजिनचा वेग वाढविल्यास गिअर बॉक्स ड्राइविंग मोडमध्ये जातो. अशावेळी यंत्र चालकाशिवाय गाडी पुढे जाते. माटुंगा येथेही अशाच प्रकारे यंत्र चालकाशिवाय गाडी पुढे गेल्याने अपघात झाल्याचे उघडकीस आले आहे.
MAN या जर्मन कंपनीच्या ओरिजिनल गिअर बॉक्स असणाऱ्या गाड्यांना Allison या अमेरिकन कंपनीचे ॲाटोमेटीक गिअर बॉक्स बसवून सदर गाड्या अग्निशमन दलामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. मॉक ड्रिल चालू असताना MAN ही गाडी यंत्रचालकाशिवाय चालू झाली आणि ती गाडी पुढे गेली. त्याचबरोबर समोरील जम्बो टॅंकरला धडकली. त्यावेळी तेथे कर्तव्य बजावत असलेल्या यंत्र चालक निवृत्ती सखाराम इंगवले यांच्यासह चंचल भिमराव पगारे आणि सदाशिव धोंडीबा कर्वे हे तिघे जवान दोन्ही गाड्यांमध्ये चिरडून गंभीर जखमी झाले. त्यांना पालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
हे ही वाचा:
कोर्ट ‘मविआ’ला दिलासा का देत नाही?
परीक्षा घोटाळा प्रकरणी कृषी अधिकारी सुशील खोडवेकर अटकेत
मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले…प्रभाग सीमांकनाची अधिसूचना जाहीर
या अपघातामागील कारणाचा शोध घेतला जात असून अपघाताला नेमकी कोणाची चूक कारणीभूत ठरली, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.