इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान संघर्षग्रस्त गाझा पट्टीमधून तीन ओलिसांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आल्याचे इस्रायलच्या लष्करातर्फे सांगण्यात आले.
इस्रायलच्या लष्कराने गाझा पट्टीमध्ये रात्रभर मोहीम चालवली. यात इत्झॅक गेलेरेंटर, अमित बुस्किला आणि शानी लुक यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. इस्रायल लष्कराचे प्रवक्ते रेअर ऍडमिरल डॅनिअल हगारी यांनी ही माहिती दिली.
‘हे तिघेही जण ७ ऑक्टोबर रोजी सुरू असलेल्या सुपरनोव्हा संगीत महोत्सवात सहभागी झाले होते. तेव्हा हमासने येथे हल्ला केला होता. त्यानंतर मेफलसिम भागात पळून गेले होते. नंतर हमासच्या दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली. त्यांचे मृतदेह गाझामध्ये नेण्यात आले,’ असे हगारी यांनी सांगितले. या तीन ओलिसांपैकी गेलेरंटर आणि बुस्किला हे दोघे जिवंत असल्याचे मानले जात होते. तर, लुक हिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. दहशतवाद्यांनी तिचे अपहरण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसेच, ऑक्टोबर अखेरीस तिच्या हाडाच्या तुकडाही सापडला होता. इस्रायलचे लष्कर अनेक महिन्यांपासून ओलिसांचा शोध घेत आहेत. अटकेत असलेल्या काही संशयित पॅलेस्टाइन दहशतवाद्यांकडूनही माहिती काढली जात असल्याचे इस्रायलतर्फे सांगण्यात आले.
‘गाझा पट्टीत सर्वच ठिकाणी तीव्र लढाई सुरू आहे. हमासने ओलीस ठेवलेल्या प्रत्येकाला सुखरूप मायदेशी आणणे हेच युद्धाच्या ठिकाणी तैनात असणारा प्रत्येक कमांडर आणि जवानांचे पहिले प्राधान्य आहे,’ याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच, इस्रायली नागरिकांनी अफवा पसरवू नयेत, असे आवाहनही लष्कराकडून करण्यात आले.
हेही वाचा :
‘आप’मधील वातावरण ‘गैरवर्तन’, ‘गुंडगिरी’चे असून ‘ब्लॅकमेल संस्कृती’ने काम सुरू
निकालाला विलंब होऊ नये म्हणून सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ब्राझीलवरून परतताना विमानात तयार केला मसुदा
‘अरविंद केजरीवाल आणि हवाला ऑपरेटर्समधील वैयक्तिक संभाषण सापडले’
‘आपल्या जवानांना सुरक्षित ठेवा. केवळ इस्रायल लष्कराच्या प्रवक्त्यांचे आणि अधिकृत व्यक्तींच्या संदेशांचे पालन करा. जी काही माहिती आम्हाला मिळेल, ती आम्ही वेळोवेळी देतच जाऊ. असे काही समजल्यास आम्ही पहिल्यांदा त्यांच्या कुटुंबीयांना कळवू आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांतर्फे सार्वजनिक करू,’ असे हगारी यांनी स्पष्ट केले.
हमासने ऑक्टोबर २०२३मध्ये दक्षिण इस्रायलमध्ये हल्ला केल्यानंतर सुमारे ११७० जण मारले गेले. तर, बहुतेक नागरिक आणि इतरांना ओलीस म्हणून ठेवण्यात आले. तर, या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने केलेल्या हल्ल्यात गाझा पट्टीमधील सुमारे ३५ हजार २७२ जण मारले गेले आहेत.