‘स्वाती मालीवाल हिच्या जीवाला धोका’

पूर्वाश्रमीच्या पतीचा दावा

‘स्वाती मालीवाल हिच्या जीवाला धोका’

राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांच्या जीवाला धोका असल्याचा तसेच, तिच्यासोबत काहीही होऊ शकते, असा आरोप त्यांचे पूर्वाश्रमीचे पती नवीन जयहिंद यांनी केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव बिभव कुमार यांनी मालीवाल यांच्यावर हल्ला केल्याची कबुली आम आदमी पक्षाने दिल्यानंतर काही क्षण उलटत नाही तोच जयहिंद यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे.

‘आप’ने पहिल्यांदाच सार्वजनिकपणे केलेल्या या वक्तव्यात ज्येष्ठ आप नेते संजय सिंह यांनी मारहाणीची घटना झाली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. तसेच, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते.

फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये जयहिंदने आप नेते संजय सिंह ‘नाटक’ करत असल्याचा आणि स्वाती मालीवाल यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला आहे. ‘स्वातीसोबत जे काही घडले आहे ते एका कटाचा भाग आहे आणि तिला धमकावले जात आहे. तिच्यासोबत काहीही होऊ शकते. आणि तिच्यावर झालेल्या हल्ल्यामागे ज्याचे नाव समोर येत आहे, तो बिभव (कुमार) उभा राहिला नाही. तो मोठ्या आवाजात बोलूही शकत नाही. तो कोणाच्या आदेशाचे पालन करतो आहे, हे मी सांगू शकत नाही,’ असे नवीन यांनी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. चार वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाल्यानंतर ते स्वाती मालीवाल यांच्याशी बोलले नव्हते. ‘आप’चे खासदार संजय सिंह यांना नियोजित सर्व बाबींची माहिती होती. मात्र आता ते नाटक करत आहेत, असा आरोप नवीन यांनी केला.

‘खासदार संजय सिंह तुम्ही नाटक का करत आहात? तुम्हाला संपूर्ण घटना माहीत आहे, बरोबर? काय होणार आहे हे तुम्हाला आधीच माहीत होते. हा हल्ला एक कट होता. स्वातीच्या जीवाला धोका आहे, हे तुम्हाला माहीत आहे, बरोबर? आता तुम्ही तिला धमकावून तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहात,’ असे या फेसबुक पोस्टवर लिहिले आहे.
स्वाती मालीवाल या सोमवारी अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी गेल्या असता, त्यांच्यावर बिभव कुमार यांनी हल्ला केला होता. असा हल्ला झाल्याची कबुली सोमवारी संजय सिंह यांनी दिली.

‘काल मालीवाल या अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेल्या होत्या. त्या ड्रॉईंग रूममध्ये त्यांना भेटण्यासाठी थांबल्या असताना बिभव कुमारने त्यांच्याशी गैरवर्तन केले. ही अत्यंत निंदनीय घटना आहे. केजरीवाल यांनी त्याची दखल घेतली असून, कठोर कारवाई केली जाईल,’ असे संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

फेसबुकवर पोस्ट केलेल्या दोन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये नवीन जयहिंद यांनी स्वाती मालीवाल यांना पुढे येऊन बोलण्यास सांगितले. ‘स्वातीने स्वतःच बोलावे. तिने इतक्या महिलांसाठी आवाज उठवला, मग ती या लोकांना घाबरते का?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

सोमवारी, पोलिसांना सकाळी नऊ वाजून ३४ मिनिटांनी एका महिलेचा पीसीआर कॉल आला. त्यात तिने सांगितले की दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तिच्यावर हल्ला झाला आहे. ‘काही वेळानंतर खासदार मॅडम पोलिस ठाण्यात आल्या. मात्र, नंतर तक्रार देऊ असे सांगून त्या निघून गेल्या,’ असे पोलिस उपायुक्त (उत्तर) एम. के. मीना यांनी पत्रकारांना सांगितले.

हे ही वाचा:

दिल्ली: प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी चोरट्याचा २०० वेळा विमान प्रवास!

लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिदनी २०२१मध्ये दिली होती होर्डिंगला परवानगी

बुडत्या उबाठाला योगेंद्र आधार

‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम’वर आणखी पाच वर्षांसाठी बंदी

विशेष म्हणजे, मालिवाल यांच्याकडून या प्रकरणाची औपचारिक तक्रार अद्याप पोलिसांना मिळालेली नाही. स्वाती मालीवाल यांनी १९ फेब्रुवारी २०२० रोजी नवीन जयहिंद यांच्यापासून घटस्फोट घेतला असल्याचे जाहीर केले होते. जयहिंद हे हरियाणासाठी ‘आप’चे संयोजक होते आणि राज्यातील २०१९च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा चेहरा होते. त्यांच्या घटस्फोटाच्या तीन वर्षांनंतर, नवीन यांनी स्वाती मालीवालवर खोटे बोलल्याचा आरोपही केला होता. स्वाती यांच्यावर तिच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार केले होते, असे तिने कधीही आपल्याला सांगितले नाही, असा दावा त्याने केला होता. स्वाती मालीवाल यांनी त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे आणि मारहाणीपासून स्वतःला वाचवण्यासाठी त्या पलंगाखाली लपून बसल्या होत्या, असे सांगितले होते. त्यानंतर जयहिंद यांची ही प्रतिक्रिया आली होती.

Exit mobile version