‘टायटन’ बाणबुडीवर मरण पावलेले पाच जण ‘खरे शोधक’ होते. त्यांच्यात साहसाची वेगळी भावना होती, अशी प्रतिक्रिया टायटॅनिक जहाजाचे अवशेष दाखवणाऱ्या ‘ओशनगेट’ कंपनीने दिली आहे. अमेरिकी तटरक्षक दलाने दिलेल्या निवेदनात पाणबुडीतील पाच जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. टायटॅनिकच्या अवशेषांपासून सुमारे १६०० फूट अंतरावर गुरुवारी पाणबुडीचे काही भाग सापडले. ही पाणबुडी रविवारी बेपत्ता झाली होती.
पाणबुडीवर ‘ओशनगेट’चे ६१ वर्षीय सीईओ स्टॉकटन रश, ब्रिटिश-पाकिस्तानी व्यापारी शहजादा दाऊद (४८), त्यांचा मुलगा सुलेमान (१९) आणि ब्रिटिश व्यापारी हमिश हार्डिंग (५८) यांचा समावेश होता. जहाजावरील पाचवी व्यक्ती होती ७७ वर्षीय पॉल-हेन्री नार्गोलेट. ते फ्रेंच नौदलाचे माजी गोताखोर आणि प्रसिद्ध संशोधक होते.
गुरुवारी अमेरिकी तटरक्षक दलाचे रिअर ऍडम जॉन मॅगर यांनी पत्रकार परिषद घेतली. ‘टायटॅनिकजवळ असणारा राडारोडा ‘टायटन’ पाणबुडीचा असल्याचे मानले जात आहे. ‘टायटन’चा नाश कशामुळे झाला, हे अस्पष्ट आहे,’ असे ते म्हणाले. मात्र, पाणबुडीवरील पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले जाण्याची शक्यता आहे की नाही, याचे उत्तर कोणीच देऊ शकले नाही.
पाणबुडी गायब झाल्यानंतर लगेचच अमेरिका, कॅनेडियन, ब्रिटिश आणि फ्रेंच देशांकडून मोठ्या प्रमाणावर तिचा शोध शोध सुरू झाला. ओशनगेट कंपनीने या पाच शोधकांना शोधण्यासाठी आमचे कर्मचारी दिवस अन् रात्र मेहनत घेत आहेत, अशी माहिती दिली. हार्डिंग हे एक उत्कट संशोधक होते. ते सदैव आपल्या कुटुंबासाठी, त्याच्या व्यवसायासाठी आणि पुढील साहसासाठी जगले,’ अशी प्रतिक्रिया हार्डिंग यांच्या कुटुंबाची कंपनी ऍक्शन एव्हिएशनने निवेदनाद्वारे जाहीर केली आहे. तर, दाऊद कुटुंबाने एका निवेदनाद्वारे बचाव दलाचे आभार मानले आहेत. ‘आम्हाला मिळालेले प्रेम आणि समर्थन यामुळे आम्ही भारावून गेलो आहेत आणि मानवतेचे सर्वोत्तम प्रदर्शन करण्यासाठी त्यांचे आभारी आहोत,’ असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.
अजमेह दाऊद म्हणाल्या, ‘माझा भाचा सुलेमान सहलीला जाण्यापूर्वी घाबरलेला होता, परंतु वडिलांना खूश करण्यासाठी तो उत्सुक असल्यामुळे त्याने प्रवासात धाडस दाखवले. मात्र सगळेच होत्याचे नव्हते झाले. ‘हार्डिंग आणि नार्जोलेट या दोन मित्रांना ‘सर्वांत भयानक मार्गाने” गमावले आहे,’ अशी प्रतिक्रिया गोताखोर तज्ज्ञ डेव्हिड मार्न्स यांनी दिली. पाणबुडीवरील मार्गदर्शक नार्गोलेट यांनी आतापर्यंत ३० हून अधिक वेळा टायटॅनिक अवशेषांना भेट दिली आहे, याची आठवण त्यांच्या कुटुंबीयांनी काढली.
हे ही वाचा:
बेपत्ता टायटन पाणबुडीतील ‘त्या’ पाच जणांचा मृत्यू
‘कॅस्ट्रोफिक इम्पोशन’मुळे पाणबुडीचा अपघात
टायटॅनिकच्या जवळ सापडले दोन अवशेष; ते टायटनचे आहेत का याचा शोध
अवशेष कसे सापडले?
रिमोटने चालणाऱ्या अंडरवॉटर सर्च व्हेइकलद्वारे पाणबुडीचा राडारोडा शोधला गेला. हे तुकडे ‘टायटन’ पाणबुडीचे असल्याचे आढळून आले. ज्यात पाणबुडीच्या शेपटीच्या एका तुकड्याचा समावेश आहे. या राडारोड्याचे आता विश्लेषण केले जाणार आहे. दोन दिवसांपूर्वी कॅनेडियन विमानाने पाण्याखालील आवाज शोधले होते. त्यामुळे पाणबुडीतील प्रवासी अजूनही जिवंत असावेत, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली होती. मात्र तटरक्षक दलाच्या दाव्यानुसार, आवाज आणि ढिगारा ज्या स्थानावर आहे, त्याचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही.